Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री अंकुशधारी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 09:46 AM2018-09-22T09:46:46+5:302018-09-22T09:47:27+5:30
गाणपत्य संप्रदायाला अलीकडच्या काळात तात्विक अधिष्ठान देण्याचे कार्य श्री गणेश योगिंद्राचार्य यांनी केले तर भक्तिमार्गाची बाग श्री अंकुशधारी महाराजांनी फुलवली.
प्रा. स्वानंद गजानन पुंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गाणपत्य संप्रदायाला अलीकडच्या काळात तात्विक अधिष्ठान देण्याचे कार्य श्री गणेश योगिंद्राचार्य यांनी केले तर भक्तिमार्गाची बाग श्री अंकुशधारी महाराजांनी फुलवली. रत्नागिरी जिल्ह्यातील टिके या गावचे भगवंत टिकेकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्या उदरी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १८०१ या पावन दिनी महाराजांचा जन्म झाला. लहानपणी यांचे नाव गजानन असे होते. आरंभी इंदूरच्या मुक्कामात सावेरच्या गणपतीबुवांनी यांना दीक्षा दिली तेथेच गणेश उपासना करीत असताना प्रत्यक्ष श्री गणेश योगिंद्रांनी दर्शन देऊन गणेश मंत्र आणि अंकुशधारी हे नाव प्रदान केले. श्रीक्षेत्र मोरगावला येऊन श्री गणेश योगिंद्राचार्यांच्या जीवनकार्याला आयुष्यभर पुढे नेण्याचे कार्य महाराजांनी केले. श्री गणेश या एकाच विषयावर तब्बल ५५६ रचना करून महाराजांनी भक्तिमार्गाचा अद्वितीय जागर केला.
जेथे, जेथे; जे, जे सुंदर दिसते तसे, तसे माझ्या मोरयाचे असलेच पाहिजे, या अट्टाहासाने शिवमहिम्नाप्रमाणे स्वानंदेश महिम्न, मनाच्या श्लोकांप्रमाणे गाणेशी मनोबोध, व्यंकटेश स्तोत्राप्रमाणे स्वानंदेश स्तोत्र अशा मूळ रचनांपेक्षाही अधिक सुरस रचना महाराजांनी केल्या. श्री योगिंद्र विजयसारखा महान ग्रंथ सिद्ध करून गाणपत्य संप्रदायाचा परिपूर्ण इतिहास जगाच्या समोर आणला. श्री अंकुशधारी महाराजांनी रचलेल्या केवळ भूपाळ्यांना पहाटे म्हणायला सुरुवात केली तर शेवटची भूपाळी म्हणेपर्यंत दुपार उलटून जाईल, इतकी अफाट रचना महाराजांनी करून ठेवली आहे. गाणपत्य संप्रदायात भक्तीचा साज चढवणारे अंकुशधारी महाराज शके १८४१ च्या माघ पौर्णिमेस स्वानंदेश चरणी लीन झाले.