प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जानन, गजानन, गजानन असा जप करता करता दोन भुवयांमधून सोंड फुटून स्वत:च गजानन झालेले अलौकिक गाणपत्य आचार्य म्हणजे भगवान भृशुंडी महाराज. मनाने आपल्या उपास्यदेवतेशी एकरूप झालेले अनेक आहेत, पण शरीरानेसुद्धा आपल्या दैवताशी एकरूप झालेले जगातील हे एकमेव उदाहरण. सध्या बीड जिल्ह्यात असलेल्या नामलगाव या गावाला पूर्वी नंदूरग्राम म्हटले जायचे. तेथे झालेला हा नामा नावाचा दरोडेखोर. दैवयोगाने महर्षी मुद्गलांच्या संपर्कात आले आणि त्यांनी दिलेल्या उपदेशाने पुढे गणेश उपासनेत रममाण झाल्यावर त्या उपासनेने स्वत: गजानन झाले. गाणपत्य संप्रदायात यांना पंचेशगुरु अर्थात ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी आणि सूर्य यांचेही गुरुरूपात वंदन केले जाते. यांच्या आश्रमात यांच्या शापाने वृक्षरूप झालेल्या शमी आणि मंदार या दोन दिव्यौषधींमुळे गाणपत्य उपासनेतील दोन दिव्य घटकांचा लाभ जगाला झाला. विनायका अवतारात भगवान गणेश यांनी मानवी देह धारण केला होता, त्यावेळी त्यांनी दर्शनाला बोलावल्यावरही गजशुंडा नसेल तर मी येत नाही हे सांगण्याइतकी भक्तीची अलौकिक एकनिष्ठता असणारे विभूतिमत्व म्हणजे भगवान भृशुंडी महाराज. ज्या महर्षी मुद्गलांच्या उपदेशाने हे तपश्चर्येला बसले त्या श्री मुद्गल यांनीच पुढे यांचे शिष्यत्व स्वीकारले, हा यांचा दिव्य अधिकार.
Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; भगवान श्रीभृशुंडी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 9:48 AM