प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: श्रावण शुद्ध पंचमी शके १४९९ ते माघ वद्य दशमी शके १७२७ असे तब्बल २२८ वर्षांचे अलौकिक जीवन असलेली दिव्य विभूती म्हणजे श्री गणेश योगिंद्राचार्य महाराज. गुजरात प्रांतातील अंबी गावचे श्री मयुरेश्वर शास्त्री आणि देवी सुशीला या दिव्य दाम्पत्याच्या नशिबात संतती नसल्याने ते तपश्चर्येकरिता श्रीक्षेत्र मोरगावला आले. मोरयाची कठोर साधना केली. फलरूपामध्ये मोरयांच्या आज्ञेने महागाणपत्यश्री मुद्गल महर्षीच श्रीगणेशयोगिंद्र रूपात अवतीर्ण झाले. स्वत: भगवान गणेशांनी नऊवेळा दर्शन देत श्रीमुद्गलपुराणाचे नऊ खंड आणून दिले. हा श्री गणेशयोगिंद्रांचा अलौकिक अधिकार. आज जगाला उपलब्ध असलेले गाणपत्य संप्रदायाचे समग्र तत्त्वज्ञान ज्या विभूतीमत्वाचा प्रसाद म्हणता येईल ते श्रीगणेशयोगिंद्राचार्य.भगवान श्री मयुरेश्वर मंदिरात श्री विघ्नहराच्या ओवरीमध्ये श्री गणेशयोगिंद्राचार्य महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रसिद्धीपरान्मुखरीत्या केवळ श्री गणेश तत्त्वज्ञानाच्या पुनरुत्थानासाठी समर्पित केले. श्रीमुद्गलपुराण भाष्य, श्री गणेशविजय, सर्व सिद्धांतसारसंग्रह गणेश गीतेवरील योगेश्वरी ही महान टीका अशा अलौकिक ग्रंथांनी आणि अगणित स्तोत्रे, आरत्या अशा स्फूटरचनांनी त्यांनी गाणपत्य धर्माची बैठक मजबूत केली. अनेक शिष्यांच्याद्वारे संप्रदाय, तत्त्वज्ञान, विविध गणेशक्षेत्रे, ग्रंथ परंपरा या सगळ्यांचा जीर्णोद्धार करणारे महान विभूतीमत्व म्हणजे श्री गणेशयोगिंद्राचार्य.
Ganesh Chaturthi 2018; गाणपत्य आचार्य परंपरा; श्री गणेश योगिंद्राचार्य महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 9:50 AM