लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वजनिक गणेश मंडळातील गणपतींचे दर्शन ऑनलाईनच करता येईल. मंडपात जाऊन कुणालाही दर्शन घेता येणार नाही. या नियमांचे कठोरपणे पालन व्हावे, असे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. (Ganesh Darshan is only on online in Nagpur )
१० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे साार्वजनिक गणपतींची स्थापना होऊ शकली नाही. नागरिकांनीसुद्धा निर्बंधांचे पालन करत गणेशोत्सव साजरा केला. कोरोनाचे संक्रमण करीत झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. प्रशासनाच्या दृष्टीने मात्र हे दिवस धोक्याचे आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गर्दी होणार नाही, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, जवळपास ९०० ठिकाणी सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार आहे.
पोलीस, एसआरपी आणि होमगार्ड जवान, अधिकाऱ्यांसह ४ हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांमध्ये भक्तांना ऑनलाईन किंवा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून विघ्नहर्त्याचे दर्शन घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. भक्तांना मंडपात उभे राहून दर्शन घेता येणार नाही. पूजा किंवा अन्य आवश्यक कामासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंडपात जाता येईल. त्यांनासुद्धा मास्क व इतर आवश्यक उपाय करणे बंधनकारक राहील.
कृत्रिम टॅंकमध्येच विसर्जन करा
मूर्ती खरेदी करणे, स्थापना करणे किंवा विसर्जन करण्यासाठी लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाता येणार नाही. जे लोक राहतील तेसुद्धा कमीत कमी राहतील. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कृत्रिम टॅंकमध्येच गणपतीचे विसर्जन करावे. महापालिकेतर्फे कृत्रिम टॅंक तयार करण्यात आले आहेत. कोरोना संक्रमण राेखण्यासाठी पोलिसांना नाईलाजाने कठोर व्हावे लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.