Ganesh Festival 2018; गणपती स्थापना: काय सांगते शास्त्र?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:34 PM2018-09-12T13:34:28+5:302018-09-12T13:35:34+5:30
ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत.
डॉ. अनिल वैद्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत.
प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत करा स्थापना
गुरुवार दि. १३ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी सिद्धिविनायकाच्या मृण्मय मूर्तीची स्थापना करून पूजन केले जाते. या दिवशी दुपारी २.४९ पर्यंत भद्रा आहे. भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नसतो. त्यामुळे प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत (अंदाजे दुपारी १.३० वाजेपर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजन करता येते. तरीसुद्धा गुरुवारी ज्यावेळी नवग्रहांपैकी शुभ ग्रह गुरु, शुक्र, बुध व चंद्राचा जास्त शुभप्रभाव वातावरण असेल ती वेळ ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली निवडल्यास फायदेशीर ठरेल. तरीसुद्धा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत आहे. सार्वजनिक गणेशाची स्थापना वरील वेळेव्यतिरिक्त सायंकाळी ६.३० पर्यंत केली तरी चालेल. गुरुवारी राहू काल दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत आहे. श्री गणेश पूजन आणि स्थापनेसाठी याचा विचार करण्याची गरज नाही.
ईशान्य, पूर्व दिशा योग्य
गणपतीची स्थापना ईशान्य, पूर्व दिशेला करून पूजन केल्यास उत्तम. देवकर्मासाठी ताजी फुले आणा. ती न सुकलेली आणि न किडलेली असावीत. तसेच देठासह वाहावीत. गणेशाला दुर्वा आणि लाल फुले अतिशय प्रिय आहेत. फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी गणेशाला तुळस वाहतात. दुर्वा आठ दिवसांनी शिळ्या होतात. शमी सहा दिवस शिळे होत नाही. ताजी फुले वाहिल्याने आपल्याला व देवाला आनंद होतो. आपल्याला प्रसन्न वाटते. शास्त्रात सांगितले आहे की तुळस ही कधीच शिळी होत नाही. सच्छिद्र झालेली फुले पर्युषित समजतात. देवाचे निर्माल्य काढताना तर्जनी व अंगठा या दोन बोटांचा उपयोग करावा. देवाला फुले वाहताना अंगठा, मध्यमा व अनामिका यांचा उपयोग करावा.
असे करा पूजन
सकाळी स्थापना व पूजनाच्या वेळी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. रोज रात्री तेलाचा दिवा देवस्थळाच्या आग्नेय दिशेस लावावा. नैवेद्याचे ताट वाढल्यावर तूप वाढून तुळशीची पाने पदार्थांवर ठेवावीत. देवासमोर पाण्याने एक चौकोनी मंडळ काढावे, त्यावर पाट आणि पाटावर नैवेद्य ठेवावा. डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन ते प्रसादाभोवती प्रदशिक्षणाकार तीनदा फिरवावे. नंतर एक पळी पाणी ताह्मणात सोडावे. नंतर हा प्रसाद पाच वायूंना अर्पण करावा. यासाठी प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाथ स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा म्हणावे. यामुळे शरीरातील पाच वायू ब्रह्मात विलीन होतात. नैवेद्य दाखवून मग त्याचे सेवन करावे.
‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’
देवासमोर उभे राहून किंवा बसूनसुद्धा त्यालाच दाखवलेला प्रसाद खाऊ नये. देवाचा प्रसाद फारच अमूल्य आहे. तो पायदळी तुडवू नका. प्रसाद खाल्ल्यावर किमान घोटभर पाणी आवश्य प्यावे. डोळे मिटून कधीही देवाचे दर्शन घेऊ नका. दोन्ही हात जोडून देवाच्या चरणांकडे किंवा डोळ्याकडे पाहावे. देव तुमच्यासाठी २४ तास जागृत असतो. मग तुम्ही डोळे बंद का करता? आपल्या लायकीप्रमाणेच देवाकडे मागा- कारण ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’.