लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून दीड व तीन दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. परंतु कृत्रिम टँक खरेदीच्या फाईलला मंजुरी मिळालेली नव्हती. अखेर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत ११५ कृत्रिम टँक खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, आयुक्त राम जोशी, अझीझ शेख यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य, उपायुक्त व विभागप्रमुख उपस्थित होते.प्रस्तावाला आयुक्तांनी १ आॅगस्ट २०१८ रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर ४ आॅगस्टला हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. याबाबतच्या निविदा मागविण्यात आल्या. यात मे. थ्री एस सोल्युशन कंपनीने सर्वात कमी दराची निविदा सादर केली. तीन निविदाकारांनी यात सहभाग घेतला होता. ५ सप्टेंबरला प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु त्यानंतरही १० दिवस ही फाईल थांबविली होती. परिणामी कृत्रिम टँक खरेदी करण्याला विलंब झाला. गणेश विसर्जनाला सुरुवात झाल्याने समितीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.झोननिहाय नोंदविण्यात आलेल्या मागणीनुसार, १२ इंच रुंद व ३० इंच जाडीच्या व १५ फू ट रुंद व ३६ इंच जाडीच्या ११५ कृत्रिम टँकच्या खरेदीचा हा प्रस्ताव आहे. जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. यावर ४१ लाख १६ हजार ७०० रुपये खर्च केला जाणार आहे. प्रस्तावात जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त न झाल्यास महापालिका हा खर्च करणार असून, निधी प्राप्त झाल्यानंतर समायोजन करण्यात येणार आहे.१७८ वॉटर हिटरचा पुरवठा होणारनागपूर शहरातील नागरिकांना १२५ लिटर प्रतिदिन क्षमतेचे सोलर वॉटर हिटर ५० टक्के सबसिडीसह पुरवठा करून कार्यान्वयन करणे या कामाकिरता मे. रिड्रेन एनर्जी प्रा. लि.राजकोट, मे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव, मे. एम. एम. सोलर प्रा. लि. नागपूर यांना अनुक्रमे १८९८ नग, ७९३ नग, ७५९ नग यानुसार कामाची विभागणी करण्यात आली होती. मात्र मे. रिड्रेन एनर्जी प्रा. लि. राजकोट या कंपनीने मार्च २०१७ मध्ये देण्यात आलेल्या १७८ सोलर वॉटर हिटर्सचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण केले नाही. नागरिकांनीमहापालिके कडे दिलेल्या डिमांड ड्राफ्टची मुदत संपल्याने ते रद्द झाले. यामुळे सदर काम मे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव आणि मे. एम. एम. सोलर प्रा.लि. नागपूर यांच्याकडून करवून घेण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. यामुळे आता लवकरच १७८ वॉटर हिटरचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे.