Ganesh Festival : नागपुरात अडचणीमुळे ६८० गणेश मंडळांनाच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 09:57 PM2018-09-12T21:57:45+5:302018-09-12T21:59:23+5:30
गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगीसाठी होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले . आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात परवानगीच्या मार्गातील अडथळे दूर न झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत ६८० गणेश मंडळांनाच अग्निशमन विभागाकडून परवानगी देण्यात आल्याची महिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगीसाठी होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले . आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सुरू करून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात परवानगीच्या मार्गातील अडथळे दूर न झाल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत ६८० गणेश मंडळांनाच अग्निशमन विभागाकडून परवानगी देण्यात आल्याची महिती आहे. वास्तविक गेल्या वर्षी ९५० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली होती.
आॅनलाईन प्रक्रियेत अनेक अडचणी आल्याने महापालिकेच्या झोन कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास परवानगीसाठी काही झोनमध्ये गर्दी होती. त्यामुळे परवानगीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी महापालिका मुख्यालयातील अग्निशमन विभागाच्या तळघरात सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु यावेळी नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता झोन स्तरावर व्यवस्था करण्यात आली. परंतु झोन स्तरावर गणेश भक्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अॅप पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यामुळे यावरून अर्ज करता आले नाही.
अग्निशमन केंद्र प्राप्त अर्ज
सिव्हील लाईन २१५
लकडगंज ६२
कॉटन मार्केट १०३
गंजीपेठ ८५
सुगतनगर ३५
सक्करदरा ५९
कळमना ४६
नरेंद्रनगर ७५
अखेर गांधीबाग झोनमध्ये कारवाई
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बाजारात विकण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत. मात्र मूर्ती विक्रेत्यांकडून त्याचे पालन होत नसतानाही उपद्रव शोध पथकाकडून कारवाई केली जात आहे. मात्र सर्वाधिक मूर्ती विक्री होत असलेल्या गांधीबाग झोन क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कुणावरही कारवाई न झाल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच बुधवारी गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक ८५ विक्रे त्यांवर कारवाई करून ३० हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
२१७ दुकानांची तपासणी
बुधवारी महापालिकेच्या सर्व झोनमध्ये एकूण २१७ दुकानांची तपासणी करण्यात आली. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मूर्ती विक्रे त्यांवर ७६ हजार ८०० रुपये दंड आकारला. यात आसीनगर झोनमध्ये २६ दुकानांची तपासणी करून ९ हजार दंड ,धरमपेठ १७ दुकाने तपासून १२ हजार दंड, धंतोली २५ दुकानांची तपासणी करून ६ हजार दंड,नेहरूनगर १४ दुकानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला. लकडगंज झोनमध्ये २५ दुकानांची तपासणी करून एक हजार दंड आकारला , आसीनगर झोनच्या पथकाने १० दुकानांची तपासणी करून ४ हजारांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनमध्ये १५ दुकानांची तपासणी करून ९ हजार रुपये दंड आकारला.