लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत सणासुदीची लगबग सुरू आहे. या दिवसांमध्ये भेसळीचे अनेक प्रकार समोर येतात. विशेषत: गणेशोत्सवामध्ये प्रसाद म्हणून वाटले जाणारे मोदक, खव्याचे पेढे, लाडू, करंजी यात भेसळ होण्याचा धोका मोठा असतो. अशा भेसळयुक्त खव्यापासून नागपूरकरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरातील अनेक बड्या हॉटेलपासून ते गल्लीबोळातील हॉटेलपर्यंतच्या पदार्थाचे नमुने गोळा करणे सुरू केले आहे.गणेशोत्सव एक आनंदसोहळा. धार्मिक व्रतवैकल्याचा एक प्रमुख भाग. लहानांपासून थोरांपर्यंत जो तो आपल्या परीने या उत्सवाचा आनंद लुटतो. गणराया आपल्यासोबत तब्बल दहा दिवस राहणार तेव्हा त्याची बडदास्त कशी ठेवता येईल याचेच विचार प्रत्येकाच्या मनात असतात. घरातील सर्व सदस्य एका वेगळ्याच उल्हासाने कामास लागतात. करंज्या, मोदक, लाडू, शंकरपाळे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करायला सुरुवात होते. यात घरातील स्त्रियांचे कौशल्यपणाला लागते. कुठे हॉटेलमधून आणण्याची लगबग सुरू होते. साहजिकच घरात रोज काही ना काही गोडधोड केले जाते. शिवाय आरतीसाठी रोज वेगवेगळी खिरापत म्हणून विविध प्रकारच्या मिठाया व मोदक असतातच. परंतु सर्व काही भक्तीभावाने होत असताना त्यात भेसळीचे विरजण पडते. चीड-मनस्ताप सहन करण्यापलीकडे काहीच उरत नाही. या काळात भेसळीच्या खाद्यपदार्थांना घेऊन तक्रारीही वाढलेल्या असतात. याची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारपासून हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने घेणे सुरू केले असून गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.भेसळीचा ‘कॅन्सर’भेसळीतून कुठला पदार्थ सुटला आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. खवाच नाहीतर तेलापासून सर्वच अन्न-धान्यात थोड्या अधिक प्रमाणात भेसळीचे प्रकार समोर आले ओहत. सद्यस्थितीत तर सकाळच्या दुधापासून ते फळापर्यंत भेसळ सर्रास आढळून येते. आता हा भेसळीचा कॅन्सर उपवासाच्या पदार्थापर्यंत पोहोचला आहे. यावर अंकुश लावण्यासाठी ‘एफडीए’ किती नमुने गोळा करून दोषींवर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुग्धजन्य पदार्थात सर्वाधिक भेसळ
दूध व दुग्धजन्य पदार्थात सर्वात जास्त भेसळ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खव्यात तर हमखास भेसळ होते. गाई-म्हशीच्या ताज्या दुधाऐवजी भुकटीचे दूध व खाद्यतेल वापरून खवा बनवला जातो. उपराजधानी त्यासाठी कुप्रसिद्ध होत आहे. या शिवाय डाळी, मसाल्याचे पदार्थ, चहा-साखर, मध, भाजीपाला, फळे, शक्तीवर्धक पेय, एवढेच नव्हे तर लहान मुलांच्या चॉकलेटपर्यंत भेसळ होते. दूधभेसळीत महाराष्ट्राचा देशात पहिला क्र मांक लागतो. त्याखालोखाल आंध्रप्रदेश, गुजरात, पंजाब अशी राज्ये येतात.
खाद्यपदार्थांचे नमुने घेणे सुरूसण-उत्सवाच्या निमित्ताने विविध प्रसादासह मोठ्या संख्येत खाद्यपदार्थांची विक्री होते. याच्या तपासणीसाठी मंगळवारपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या दिवशी तीन-चार हॉटेल्सचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. बुधवारपासून या मोहिमेला गती देण्यात येईल.मिलिंद देशपांडेसहायक आयुक्त, (अन्न) अन्न व औषध प्रशासन