लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पा मोरयाचा उत्सव आता काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनही विक्रेत्यांमधील मूर्ती विक्रीबाबतचा संभ्रम संपलेला नाही. असे असताना मनपाच्या झोन कार्यालयातून विक्रेत्यांची दिशाभूल केली जात आहे. विक्रीची परवानगी मागण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांच्या हातात दंडाची पावती ठेवली जात आहे.कोरोना संसर्ग आणि टाळेबंदीमुळे इतर क्षेत्राप्रमाणेच मूर्तिकार संकटात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यंदा मनपा आयुक्तांकडून श्रीगणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले जात आहे. २२ ऑगस्टपासून श्रीगणेशोत्सव सुरू होत आहे तरीदेखील मूर्तिकारांवरील संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच विक्रेत्यांनाही प्रशासकीय बाबूगिरीचा सामना करावा लागत आहे. विक्रेते मनपाच्या झोन कार्यालयात विक्रीची किंवा स्टॉल लावण्याची परवानगी घेण्यास जात आहेत. मात्र, काही झोन कार्यालयात थेट परवानगी नाकारली जात आहे.
दंड म्हणजेच परवानगीसोमवारपासून सक्करदरा बाजारात मूर्ती विक्रीची दुकाने लावणार असल्याने, त्याच्या परवानगीसाठी आणि माती व पीओपी मूर्तींची नोंदणी करण्यासाठी नेहरूनगर झोनमध्ये शनिवारी गेलो होतो. त्याअनुषंगाने तेथे हजार रुपये शुल्काची पावती फाडली. पावती बघितल्यावर लक्षात आले की पावती दंडाची आहे. विचारणा केल्यावर त्यांनी दंडाची पावती म्हणजेच परवानगी असल्याचे सांगितले. मात्र, दुकान लावण्याआधीच दंड कसला, याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाले नाही. परवानगी हवी असेल तर सिव्हिल लाईन्सला जा, असे सांगण्यात आल्याचे मूर्ती विक्रेते बबलू कापट यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विक्रीची परवानगीे, ऑड-इव्हन पाळामूर्ती विक्रीची परवानगी कधीच नाकारलेली नाही, ती सुरूच आहे. काही विक्रेत्यांना त्यांनी नियम न पाळल्यामुळे दंड केल्यानंतर ते स्वत: झोन कार्यालयात गेले आणि आता तरी परवानगी द्या, अशी विनवणी करत होते. विक्रीची परवानगी प्रत्येक झोन कार्यालयातून घेता येईल. विक्री करताना प्रत्येक विक्रेत्याला ऑड-इव्हनचा नियम पाळावाच लागणार आहे.-राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा