दोन मोठे कृत्रिम टँक राहणार : मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृतीनागपूर : या वर्षी गणेशोत्सवात सक्करदरा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण समितीने पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना, शाळा व नागरिकांची मदत घेऊन यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तलाव पसिरात दोन मोठे कृत्रिम टँक उभारले जातील. याशिवाय लहान कृत्रिम टँकही ठेवले जातील. यातच मूर्ती विसर्जित करावी लागेल.दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी या मोहिमेच्या जनजागृतीसाठी एक रथ तयार केला आहे. या रथाचे लोकार्पण शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाल येथे झाले. या वेळी कोहळे यांनी सांगितले की, सक्करदरा तलावातून गेल्या उन्हाळ्यात १८०० ट्रक माती काढून तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. त्यामुळे आता मूर्ती विसर्जनाने तलावात माती साचू नये, पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी तलावात मूर्ती विसर्जन करू दिले जाणार नाही. नागरिकांनीही त्यासाठी आग्रह धरू नये, असे आवाहन आ. कोहळे यांनी केले. नागरिकांमध्ये या विषयीची जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांची मदत घेतली जात आहे. समितीने जनजागृतीसाठी काढलेली पत्रके विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविली जात आहेत. याशिवाय जनजागृती करणारी एक व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. एक मोबाईल व्हॅन १३ ते २७ सप्टेंबरदरम्यान सर्व गणेश मंडळांसमोर उभी राहील व पाच मिनिटांची चित्रफित दाखविली जाईल. भाजपचे कार्यकर्ते व सात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही या मोहिमेत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ईश्वर धिरडे, प्रा. विजय घुगे, नवीन खानोरकर, नगरसेविका दिव्या धुरडे, स्वाती आखतकर, संजय ठाकरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सक्करदरा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन नाही
By admin | Published: September 13, 2015 2:48 AM