लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणपती विसर्जनाला सारे काही पारंपरिकच. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी मनसोक्त झाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... असे आवाहन गणरायाला गणेशभक्तांनी केले. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला... या भावनांनी गणरायाला निरोप देण्यात आला. गणरायाला निरोप देताना हळवे झालेले चिमुकल्यांचे चेहरे आणि गणपती बाप्पा मोरयाचा ठसकेबाज जयजयकार करणाऱ्या तरुणांचा उत्साह विसर्जन परिसरात ओसंडून वाहत होता. पण विसर्जन स्थळावर आल्यानंतर, तलाव वाचले पाहिजे याची जाणीवही भाविकांमध्ये दिसून आली. कारण प्रशासनानेही तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. तलावाच्या संपूर्ण परिसरासह शहरातील विविध भागात २५१ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होेते. प्रशासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांनीही निर्माल्य गोळा करण्यापासून, मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची जाणीव भाविकांना करून दिली होती. जागोजागी लावण्यात आलेले पर्यावरण रक्षणाचे बॅनर, पोस्टर्स यामुळे गणेशभक्तही नमला आणि प्रदूषणमुक्त विसर्जनाला प्रतिसाद देत, समाधानाने गणरायाचे विसर्जन करून गेला. प्रदूषणमुक्तीचा एक मोठा बदल गेल्या काही वर्षात यंदा दिसून आला.अनंत चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली होती. शहरातील सोनेगाव, सक्करदरा, गांधीसागर, अंबाझरी या तलावांना तर चारही बाजूने बॅरिकेड लावण्यात आले होते. तलावात एकही मूर्ती जाणार नाही, निर्माल्यातील एक फूलही तलावात पडणार नाही, असे नियोजन प्रशासनाने केले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यापासून ७०० कर्मचाऱ्यांनी तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते. प्रशासनाच्या मदतीला स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचा, महाविद्यालयीन तरुणांचासुद्धा हातभार लागला होता. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या विसर्जनाच्या सोहळ्यात प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून होते. शहरातील मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी फुटाळा आणि नाईक तलावावर परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे हे दोन तलाव वगळता नागपुरातील इतर तलावात प्रदूषणमुक्त विसर्जन पार पडले. सोनेगाव तलावात १०० टक्के प्रदूषणमुक्त विसर्जनग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनने सोनेगाव तलावात १०० टक्के प्रदूषणमुक्त विसर्जनाची संकल्पपूर्ती केली. आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेवक प्रकाश तोतवाणी, श्रीकांत बोहरे, परमानंद छंगवानी, प्रसाद कापरे, विवेक गाडगे, भोलानाथ सहारे यांच्या सहकार्यातून गेल्या काही वर्षांपासून तलावाच्या काठावरच एका मोठ्या कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे, या भावनेतून ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी सकाळपासून परिसरात ठिय्या देऊन होते. त्यांच्या सोबतीला वात्सल्य चाईल्ड वेलफेअर फाऊंडेशन, रोटरी क्लब आॅफ नागपूर फोर्ट, डॉ. आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले होते. मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांकडून निर्माल्य गोळा करण्याचे काम संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते करीत होते. लक्ष्मीनगरपासून ते विमानतळापर्यंतच्या भागातील गणेशभक्तांनी या कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून सोनेगाव तलावाला १०० टक्के प्रदूषणमुक्त ठेवले. विसर्जनही समाधानकारकबाप्पांचे विसर्जन समाधानकारक व्हावे अशी भावना भाविकांची असते. तलावात भाविकांकडून फेकल्यागत विसर्जन करण्यात येते. सोनेगाव परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात भाविकांना विसर्जनाचे समाधान मिळत होते. विसर्जनापूर्वी मूर्तीची पूजा अर्चना झाल्यानंतर लक्ष्मीनगर झोनचे कर्मचारी भाविकांकडून मूर्ती घेऊन मूर्ती कुठेही भंगणार नाही, भाविकांना वेदना होणार नाही, अशा पद्धतीने कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करीत होते. विसर्जन सोहळ्याने फुलला फुटाळादरवर्षीप्रमाणे यंदाही फुटाळा तलावावर विसर्जनाचा भव्य सोहळा साजरा झाला. फुटाळा तलावाच्या दक्षिण भागाला मंडळाच्या मूर्तीचा विसर्जन पॉर्इंट होता. तर इतर भागात घरगुती गणपतीचे विसर्जन होते. पोलीस यंत्रणेसह, महापालिकेचे प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने सेवाकार्य करीत होते. रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, गुलालांची उधळण करीत मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू होते. विसर्जन सोहळा बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर फुटाळ्यावर पोहचले होते. विसर्जनानिमित्त झालेली गर्दी, वाहनांची वर्दळ लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनच्या मदतीने गर्दीवर नजर ठेवण्यात येत होती. फुटाळा परिसरात पोलिसांनी कंट्रोलरुम तयार केले होेते. पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तात होते. महापालिकेच्या धरमपेठ झोनवर विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी होती. सहायक आयुक्त महेश मोरोने यांच्यासह अधिकारी तलावाच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत होते. मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने कृत्रिम टँक, निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. परिसरात निर्माल्य संकलनाबरोबरच, वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते प्रयत्नरत होते. पोलिसांच्या सुरक्षेमुळे कुठलीही विपरीत घटना विसर्जन स्थळावर घडली नाही. भाविकांनी श्रद्धेने विसर्जन करून बाप्पांना निरोप दिला. मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन फुटाळा तलावात झाले. तर स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नामुळे घरगुती मूर्ती मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात विसर्जित झाल्या. फुटाळा तलाव काहीसा प्रदूषित झाला. तरीसुद्धा तलावातील विसर्जनाचे प्रमाण कमी होते. निर्माल्यसुद्धा कमी प्रमाणात तलावात विसर्जित झाले.