लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाडक्या बाप्पाला निरोप देताना कसलाही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्ताची विशेष तयारी केली आहे. शहरातील विसर्जनाच्या सर्वच ठिकाणी तसेच रस्त्यारस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सात पोलीस उपायुक्तांसह १७०० पोलीस बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांचे आणि घरगुती गणपतीचे विसर्जन २३ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या पर्वावर केले जाणार आहे. त्यासाठी बाप्पांची वाजतगाजत मिरवणूक काढून भाविक मंडळी बाप्पांना निरोप देतात. मुख्य रस्त्यावरून बाप्पांच्या मिरवणुका निघत असल्याने वाहतुकीवर कोणताही प्रभाव निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे विसर्जनाच्या प्रमूख ठिकाणी अर्थात फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, कोराडी आणि कळमना तलावासह महादेव घाट कामठी, वाडी आणि हिंगणा भागातील काही ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. वाहतुकीला अडसर निर्माण होऊ नये किंवा कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणांहून वाहतुकीचा मार्ग तात्पुरता वळविण्यात आला आहे. त्यासाठी एक अधिसूचनाही पोलिसांनी काढली आहे. मिरवणुकीच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहून काही समाजकंटक आपले कलुषित मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. संवेदनशील ठिकाणी दगडफेक करणे, घोषणाबाजी करणे, गुलाल उधळणे असे प्रकार जाणीवपूर्वक होऊ नये म्हणून रस्त्यारस्त्यावर तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. उपद्रवी व्यक्तींना जेरबंद करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीत सहभागी होतील.असा आहे बंदोबस्तपोलीस उपायुक्त - ०७सहायक आयुक्त -१०उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक - १७१पोलीस कर्मचारी पुरुष - १५०८पोलीस कर्मचारी महिला - १८०राज्य राखीव दलाची कंपनी - ०१पोलीस आयुक्तांचे आवाहनसर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या नागपूर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पालाही अशाच शांततेत निरोप द्यावा. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, याची नागपूरकरांनी काळजी घ्यावी. कुठे काही गडबड गोंधळ दिसल्यास, संशयित व्यक्ती वा वस्तू आढळल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.