अकोला - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मलकापूर-अकोला आणि श्री शिवाजी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने गणलक्ष्मी करंडक विदर्भ स्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा-२०१७ श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृह येथे शनिवारी पार पडली. नागपूरची रश्मी खेडीकर गणलक्ष्मी करंडकाची मानकरी ठरली.
गणलक्ष्मी करंडक व पुष्पा कट्यारमल स्मृतिप्रीत्यर्थ ५००१ रोख मान्यवरांच्या हस्ते देऊन रश्मीचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार अकोलाची काजल राऊत हिने पटकावला. काजलला शांताराम जैन स्मृतिप्रीत्यर्थ ३००१ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. तृतीय पुरस्कार वर्धाचा प्रतीक ढोबळे याने मिळविला. मयूरी भगत (जालना) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २००१ रोख बक्षीस प्रतीकला देण्यात आले, तर दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी ५०१ रुपये व प्रमाणपत्र उत्तेजनार्थ पुरस्कार सहा स्पर्धकांना देण्यात आला.
यामध्ये गणेश वानखेडे अमरावती, दीपक नांदगावकर अमरावती, अश्विनी पिंपळकर नागपूर, अमर तिवारी अकोला, साहिल परवाळे नागपूर आणि अकोल्याचा प्रकाश सावळे याला पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, प्रा. डॉ. अमोल देशमुख, हरीश इथापे, प्रा. मधू जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.