धीरज शुक्लालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गणेशोत्सवाला अजून बराच वेळ असला तरी गणेश मंडळे तयारीला लागली आहेत. शहरातील जवळपास १२०० ते १३०० वर लहानमोठी गणेश मंडळे प्रशासनाकडून मिळणाऱ्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. भक्तांना कोविड-१९ पासून वाचवण्यासाठी सर्व उपाययोजनांवर मंथन केले जात आहे. मंडळे यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा विचार करीत आहेत.यंदा भव्य शोभायात्रेसह बाप्पाचे आगमन होणार नाही. दर्शनासाठी सुद्धा लांगलचक रांगा राहणार नाहीत. विविध स्पर्धा आणि महाप्रसादांचे आयोजनही होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर अनेक मंडळांनी ४ फुटाच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंडपामध्ये सुद्धा मोजकेच पदाधिकारी राहतील. यातही सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्याचीही तयारी केली जात आहे. लोकमतने अशाच काही मंडळांशी त्यांच्या तयारीसंदर्भात चर्चा केली. तेव्हा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देत शासन-प्रशासनाकडून लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रशासनाकडून जे काही दिशानिर्देश दिले जातील, त्याचे पूर्णपणे पालन केले जाईल, असेही सांगितले.श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळसीए रोड दारोडकर चौक येथील श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाचे संयोजक संजय चिंचोळे यांनी सांगितले, आम्ही ४ फुटाचीच गणेशमूर्ती स्थापन करून परंपरा सुरु करण्याचा विचार करीत आहोत. केवळ आजूबाजूच्या मोजक्या लोकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल किंवा आॅनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. कुठल्याही प्रकारची भव्यता राहणार नाही. साधेपणाने परंतु परंपरेनुसार पूजा-पाठ, अनुष्ठान, आरती केली जाईल. अध्यक्ष राजेश श्रीमानकर यांनी सांगितले की, गेल्या ६० वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करीत आहोत. यावर्षी आॅनलाईन दर्शनासह आॅनलाईन स्पर्धांचेही आयोजन केले जाऊ शकते. महाप्रसाद आदी होणार नाही.