लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घातक शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपावर दरोडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. या टोळीच्या सूत्रधारासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नरेंद्रनगर आणि पडोळे चौकात घातल्या गेलेल्या दरोड्याच्या दोन गुन्ह्यांचा कबुलीजबाबही पोलिसांनी मिळवला.विनोद घनशयाम मेश्राम (वय २७), राजू ऊर्फ कौशल गोविंदसिंह चव्हाण (वय २१, रा. सूभाषनगर), करण राजेश उईके (वय २१, रा. अजयनगर), धीरज दयाशंकर बघेल (वय १९, रा. गायत्रीनगर) आणि पंकज ऊर्फ मंगेश गणेश मते (वय १८, रा. सुदाम नगरी, अंबाझरी) हे या टोळीतील सदस्य असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत.६ फेब्रुवारीच्या रात्री तोंडाला स्कार्फ बांधून या टोळीतील सशस्त्र गुन्हेगारांनी प्रतापनगरातील पडोळे चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा घातला होता. रोखपाल संजय बवाणे याला गंभीर जखमी करून आरोपींनी ४० हजार तसेच मोबाईल हिसकावून नेला होता. या घटनेपूर्वी अशाच प्रकारे या टोळीने १० जानेवारीला नरेंद्रनगर पुलाजवळ असलेल्या वैष्णवी पेट्रोल पंपावर एका कर्मचाऱ्याला जबर जखमी करून रक्कम हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला होता. वर्दळीच्या मार्गावरील पेट्रोल पंपावर २७ दिवसात दोन सारखे गुन्हे घडल्याने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली होती. प्रतापनगर आणि अजनी पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचे पथकही या दरोड्यांचा समांतर तपास करीत होते. गुरुवारी रात्री प्रतापनगरातील अमेय हार्डवेअरच्या बाजूला अशाच प्रकारे काही सशस्त्र गुन्हेगार दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून उपरोक्त पाच आरोपींना पकडले. त्यांनी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतच प्रतापनगर आणि नरेंद्रनगरातील पेट्रोल पंपावरच्या दरोड्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक आॅटो, दोन दुचाक्या, मोबाईल आणि घातक शस्त्रांसह १ लाख, ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी विनोद मेश्राम आणि राजू चव्हाण हे दोघे सराईत गुन्हेगार असून मेश्रामच्या विरोधात हत्या, दुखापत, चोरी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.नरेंद्रनगरातील गुन्हेगारनरेंद्रनगरातील पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या गुन्ह्यात राजू ऊर्फ कौशल गोविंदसिंग चव्हाण, करण राजेश उईके आणि पंकज गणेश मते या तिघांचा समावेश होता. त्यांनी रक्कम लुटण्याच्या प्रयत्नात एकाला गंभीर जखमी केले होते. मात्र, रक्कम बाळगणारे कर्मचारी पळून गेल्याने आरोपींना तेथे दमडीही मिळाली नाही. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कामी लागलेल्या पोलिसांना सीसीटीव्हीत केवळ अंधार दिसत होता. मात्र, कर्मचाºयांनी सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची यादी बाहेर काढून त्यांच्या मुसक्या बांधण्यात यश मिळवले.प्रयत्नात अटक, दरोडा शिल्लकपोलिसांनी उपरोक्त आरोपींना गुरुवारी रात्री दरोड्याच्या प्रयत्नात असल्याच्या गुन्ह्यावरून अटक केली. त्यांना कोर्टात हजर करून चार दिवसांचा पीसीआर मिळवला होता. हा पीसीआर संपल्यानंतर त्यांना प्रतापनगर आणि अजनीतील दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू ढेरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत सगणे, उपनिरीक्षक आशिष चेचरे, उपनिरीक्षक सुनील राऊत, हवलदार राजेश यादव, प्रकाश सिडाम, धनराज देशमुख, अरुण चहांदे, नामदेव टेकाम, नरेंद्र ठाकूर, रवी साहू, मंगेश लांडे आणि प्रितम ठाकूर यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:43 PM
घातक शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपावर दरोडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. या टोळीच्या सूत्रधारासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली.
ठळक मुद्देसूत्रधारासह पाच गजाआड : दोन गुन्ह्यांचा खुलासा, दोघे फरार