नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींच्या प्लॉट्सची विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला आहे. या प्रकरणात १६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
इमाम खान अब्दुल रहीम खान (३३, बेसा बेलतरोडी), पवनकुमार कालकाप्रसाद जंगेला (३४, मनिष नगर), नारायण वर्मा, प्रतिभा विलास मेश्राम (४६, उमरेड), विजय उईके. कौशल संजय हिवंज (२२, परसोडी वर्धा रोड), अथर्व श्रीकृष्ण भाग्यवंत (२२, गोपालनगर), भुपेश कवडुजी शिंदे (४०, शंकरपुर बेलतरोडी), प्रविण मोरेश्ववर सहारे (४६, गोधनी मानकापूर), साहील बिलाल शेख (२३, भामटी रोड, सुजाता ले आउट), कार्तीक उर्फ रजत शिवराम लोणारे (३०, मेहंदीबाग रोड, शांतीनगर), सिध्दार्थ वासुदेव चव्हाण (४०, स्नेहदिप काॅलोनी, जरीपटका), मोहम्मद रियाज उर्फ बबलु अब्दुल रौफ (५४, कसाबपुरा, मोमीनपुरा), नासीर हसन खान (४३, स्वागत नगर, गिट्टीखदान), इमरान अली अख्तर अली (४३, संजय बाग काॅलोनी, यशोधरानगर) व रुपेश अरुण वारजुरकर (३४,महात्मा फुले नगर, अजनी) अशी आरोपींची नावे आहेत. निशा राजकुमार जाजू यांनी मौजा नारा येथे १९९२ साली तीन हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. या टोळीने खोटी महिला उभी करून इमाम खान अब्दुल रहीम खान (३३) याला पाच लाखात प्लॉटची विक्री केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. बनावट महिलेच्या बॅक खात्यातून प्रवीण सहारे हा आरोपी पैसे काढण्यासाठी आला असता त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर विक्रीपत्रात साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे पवनकुमार जंदेला, कौशल हिवंज, अथर्व भाग्यवंत यांना अटक करण्यात आली होती. सहारेच्या मोबाईलचा तपास केला असता टोळीची माहिती समोर आली होती.
सह दुयम निबंधक याच्या कार्यालयात काम करणारा कार्तीक उर्फ रजत लोणारे यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता तो दुयम निबंधक कार्यालयातून त्याच्या ओळखीचा सिद्धार्थ चव्हाण याला रेकॉर्डमधून कागदपत्रे पुरवित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कार्तीक उर्फ रजत लोणारे व सिध्दार्थ चव्हाण यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी इमरान अली या आरोपीच्या वाहनाची झडती घेतली असता त्यात अनेक बनावट नोटा व बोगस कागदपत्रे आढळून आली. या नोटा त्याने मोहम्मद रियाझ याच्याकडून घेतल्या होत्या. या टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय मेंढे, विनोद रहांगडाले, संतोष शिरडोळे, नारायण घोडके, संतोष खांडेकर, सुनिल राउत, प्रलेश कापसे, सविता नाहमुर्ते, किशोर लोहकरे, संघदिपा सदावर्ते, विक्रमसिंग ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्लॉटची पडताळणी करण्याचे आवाहन
या टोळीने अनेक प्लॉट्सची बोगस दस्तावेज व व्यक्तींच्या आधारे विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या मालकीच्या भुखंडाचा मागील ४ ते ५ वर्षापासुन पाठपुरावा किंवा पाहणी केली नसल्यास नागपूर सुधार प्रन्यास येथे जावुन आपल्या भुखंडाचीपडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.