लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर लावलेला शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून नागपुरात कुख्यात गुन्हेगाराच्या टोळक्याने एका तरुणाची भीषण हत्या केली.ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते. जितेंद्र वासुदेवराव बडे (वय २९) असे मृताचे नाव असून तो संजय गांधीनगरात राहत होता.जितेंद्र बडे त्याचे मित्र रितिक धनराज डेंगे (वय २०, रा. भोलेबाबानगर) आणि अभिजित खरात हे तिघे रविवारी मध्यरात्री उदयनगर चौकात गप्पा करीत होते. तेवढ्यात तेथे प्रसाद दशरथ रोकडे (वय २५, रा. दुबेनगर) आणि त्याचे साथीदार आले. त्यांनी जितेंद्रला एक पोस्टर फाडल्याबद्दल जाब विचारला आणि तू इकडचा दादा आहे, का असे विचारत त्याच्याशी वाद घातला. कुणाला काही कळायच्या आधीच, थांब तुला दाखवतो म्हणत आरोपी रोकडे आणि साथीदारांनी जितेंद्र बडेला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर चाकूचे घाव घातले. बडेला गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील बडे याला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळपासूनच संजय गांधीनगरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींची शोधाशोध सुरू केली. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत आरोपी पोलिसांना सापडले नव्हते.बडे कुटुंबीयांवर आघातआरोपी रोकडे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे हुडकेश्वर पोलीस सांगतात. तर, मृत बडे हा धंतोलीतील एका रुग्णालयात टेक्निशियन म्हणून काम करायचा. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी घरातील तरुणाचा असा घात झाल्याने बडे कुटुबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे.