नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थनिक गुन्हे शाखेची कारवाई रामटेक : तालुक्यातील चिचाळा शिवारातील डीएलएस कंपनीच्या आवारातून चोरट्यांनी सुरक्षा रक्षक व ट्रकचालकांना जबर मारहाण करीत एकूण ५६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामठी परिसरातून शुक्रवारी सकाळी चोरट्यांच्या टोळीस अटक केली. या टोळीत एकूण ११ जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ९ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिट्टू ऊर्फ भूषण ओंकार तरारे (२५, रा. आझादनगर, कामठी), काका ऊर्फ सतीश जवाहरलाल पाली (५४, रा. मच्छीपूल, कामठी), सूरज विकास रंगारी (२३, रा. रमानगर, कामठी), शेख अनवर शेख अमीन (२८, रा. अब्दुलशाह दर्ग्याजवळ, कामठी), पप्पू ऊर्फ दिलीप राजेंद्र साहू (३१, रा. अशोकनगर, कमाल टॉकीज, नागपूर), राजकुमार रवी मानकर (२१), शेख वसीम शेख सलीम (२२), अब्बू हुसेन बेग जुम्मन (२०), आकाश गणेश तिरपाडे (२०), सूरज शंकर वानखेडे (२०), गगन नागराज थूल (२२)सर्व रा. कामठी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. चिचाळा शिवारात डीएलएस नामक कंपनी आहे. या ११ जणांनी संगनमत करून फेब्रुवारीमध्ये या कंपनीच्या आवारात प्रवेश केला. ते सुरक्षा रक्षकाला दिसताच सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले. त्यामुळे चोरट्यांनी सुरक्षा रक्षक व त्याच्यासोबत असलेल्या दोन ट्रकचालकांना काठ्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले आणि कंपनीच्या आवारात पडलेले विविध लोखंडी साहित्य ट्रकमध्ये भरून पळ काढला. या साहित्याची किमत ५६ लाख रुपये असून, या प्रकरणी सीताराम सव्वालाखे, रा. चिचाळा, ता. रामटेक यांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. रामटेक पोलिसांनी सुरुवातीला तपासकार्य केले. चोरटे न गवसल्याने या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, सदर चोरटे हे कामठी येथील असल्याची गुप्त माहिती पोलीस अधिकाऱ्यांना प्रापत झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी कामठी ड्रॅगन पॅलेस परिसरात सापळा रचला आणि सुरुवातीला भूषण, सतीश, सूरज, शेख अनवर शेख अमीन यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्यात त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचे साहित्य त्यांनी दिलीपला विकल्याचे सांगितल्याने दिलीपलाही अटक केली. या चोरीत राजकुमार, शेख सीम शेख सलीम, अब्बू हुसेन बेग जुम्मन, आकाश, सूरज यांचा समावेश असल्याची माहिती मिळताच सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत अटक करण्यात आली. या सर्वांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली देताच त्यांच्याकडून चोरीचे साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला एमएच-४०/एके-६४१६ क्रमांकाचा ट्रक, चार मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ९ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. (तालुका प्रतिनिधी) असा लागला सुगावा या घटनेच्या तपासासाठी रामटेक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सायबर सेलला सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यात पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळावर खर्ऱ्याचा एक कागद दिसून आला. हा कागद कामठी येथील एका ट्युशन क्लासेसचा असल्याने चोरटे कामठी परिसरातील असावेत, असा संशय आल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासकार्य सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना चोरीतील आरोपी कामठी येथील असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा संशय खरा ठरला आणि चोरट्यांना अटक करण्यात आली.
अट्टल चोरट्यांची टोळी गजाआड
By admin | Published: March 11, 2017 2:45 AM