नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या खास कोट्यातून एमबीबीएसला अॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या विविध राज्यातील शेकडो जणांना एका टोळीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. कुणाच्या पालकाकडून १० तर कुणाकडून ३५ लाखांपर्यंतची रक्कम उकळणाऱ्या या टोळीचे नेटवर्क नागपूर, सोलापूर, मुंबई, दिल्ली, अजमेर, जयपूरसह विविध शहरात आहे. सौरभ श्रीवास्तव (वय ३८, रा. सेक्टर ५०, गुडगाव, हरियाणा), सचिन उत्तलकर (वय ३०, रा. खारघर, सेक्टर २१, नवी मुंबई), शंकर मानवटकर (वय ३०, रा. रिलायन्स फ्र्रेशजवळ, अथर्वनगर, बेसा), उल्हास सेवारे (वय ३०) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. तर, प्रमोद आणि प्रभाकर नामक दोन पात्रही या टोळीत महत्त्वाची भूमिका वठवितात.मार्च-एप्रिल दरम्यान ही टोळी मोठ्या शहरातील बस, रेल्वेस्थानक आणि वर्दळीच्या ठिकाणी पोस्टर, पॉम्प्लेट चिकटवतात. एमबीबीएसच्या प्रवेशासाठी विशेष मार्गदर्शन आणि हमखास यशाची हमी देण्याचा दावा त्यात असतो. डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगविणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वाचनात हे पोस्टर, पॉम्प्लेट गेल्यास ते त्यातील नमूद क्रमांकावर संपर्क करतात. या टोळीतील सदस्य त्यांना मध्यवर्ती ठिकाणावर बोलवतात. लोकमतच्या हाती आलेल्या पुराव्यानुसार, या टोळीने एप्रिल २०१७ मध्ये वर्धा, अमरावती, आकोट, अकोला, जालना, परभणी, सोलापूर, औरंगाबादसह राज्यातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नागपूरच्या शांतिनगर हॉटेलमध्ये बोलवून घेतले होते. येथे या पालकांना थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अॅडमिशनचे स्वप्न दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना कमी मार्कस् असतील तर केंद्र सरकारच्या कोट्यातून (सीपी कोटा) काम जमवून देण्याचीही उपरोक्त आरोपींनी बतावणी केली. पालक तयार होताच त्यांच्या पाल्याची शैक्षणिक कागदपत्रे मागवून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना अॅडमिशन होऊ शकते, अशा आशयाचे एसएमएस पाठवून पालकांना एप्रिल-मे दरम्यान दिल्लीला एका पॉश हॉटेलमध्ये बोलविले. तेथे कुणाला १० लाख, कुणाला १५, २५ तर कुणाला चक्क ३५ लाखांपर्यंतची रक्कम (अॅडमिशन फी) सांगण्यात आली. ही रक्कम घेतानाच पालकांना खात्री पटावी म्हणून ठगबाजांनी त्यांना तेवढ्या रकमेचे पोस्ट डेटेड चेकही दिले. रक्कम घेतल्यानंतर त्यांच्याकडून १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर सह्या घेण्यात आल्या आणि त्यांना जून २०१७ मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थानमधील वेगवेगळ्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन झाल्याचे पत्र देण्यात आले. त्यावर राजमुद्रेचा गैरवापर करून आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या नावाची बनावट स्वाक्षरी केलेली आहे.
असा झाला भंडाफोडअमरावतीचे कंत्राटदार शेख मकसूद जुम्मामियां यांच्या मुलीची अॅडमिशन सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाल्याचे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार, शेख मकसूद आपल्या मुलीला घेऊन २६ जून २०१७ ला सोलापूरला पोहचले. त्यांनी तेथे मुलीच्या अॅडमिशनचा प्रयत्न केला असता त्यांना मिळालेले पत्र बनावट असल्याचे आणि अॅडमिशन प्रक्रिया संपल्याचेही सोलापूर प्रशासनाने शेख मकसूद यांना सांगितले. हा प्रकार मकसूद यांनी आरोपी सचिन तसेच मानवटकरला सांगितला. यावेळी त्यांनी आमचे दिल्लीला डॉक्टर असून, त्यांच्याकडून मुलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देतो, त्या प्रमाणपत्राच्या आधारे विलंब झाला तरी अॅडमिशन होऊ शकते, अशी थाप मारली. तर, या क्षेत्रातील मंडळींनी असे शक्यच नसल्याचे ठासून सांगितल्याने मकसूद यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली. आरोपींनी त्यांना १० पैकी ३ लाख परत केले. उर्वरित सात लाखांची रक्कम परत देण्यासाठी सहा महिने झुलविले. आरोपींनी केवळ अमरावतीच्या मकसूद यांनाच नव्हे तर वर्धा, अमरावती, आकोट, अकोला, जालना, परभणी, सोलापूर, औरंगाबादसह राज्यातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गंडा घातला आहे.श्रीवास्तव बाऊ न्सरच्या गराड्यात, प्रमोद आणि प्रभाकर अंधारातया टोळीचा सूत्रधार सौरभ श्रीवास्तव असून, तो नेहमी बाऊन्सरच्या गराड्यात वावरतो तर, या टोळीतील प्रमोद आणि प्रभाकर नामक बॉस नेहमी अंधारात असतात. ते केवळ फोनवरच बोलतात. प्रत्यक्षात कधीही समोर येत नाहीत. आरोपी सचिन याने नवी मुंबईतील खारघर परिसरासत ‘भारतीय उच्च माध्यमिक शिक्षा परिषद भारत‘‘या नावाने एका आलिशान इमारतीत आॅफिस थाटले आहे.