३.५० लाखाचे मोबाईल जप्त : लोहमार्ग पोलिसांची कारवाई नागपूर : रेल्वे प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या झारखंडच्या टोळीचा लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश करून पाच आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून ३.५३ लाखाचे २७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सोनू महत राम महतो (१८), गणौरी शेख शेख किताब अली (४८), चंदनकुमार महतो श्रीराम महतो (३०), मनोज मंदर बीएचएल मंदर (२८) आणि सूरज मंडल बाबुलाल मंडल (२२) सर्व जण रा. महाराजपूर, नया टोला, कल्याणी महाराजपूर बाजार, तलझाडी जि. साहेबगंज (झारखंड) अशी आरोपींची नावे आहेत.लोहमार्ग पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी झारखंडमध्ये राहणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले इतर साथीदार नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खुशाल शेंडगे, हवालदार दीपक डोर्लीकर, पोलीस नायक महेंद्र मानकर, रवींद्र सावजी, श्रीकांत उके, प्रवीण भिमटे, संतोष निंभोरकर, चंद्रशेखर मदनकर, रोशन मोगरे, विनोद नांदे, योगेश धुरडे, सुवर्णा मुरादे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने शहरात विविध ठिकाणी जाऊन पाच आरोपींना आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ५३ हजार रुपये किमतीचे २७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व मोबाईल नागपूर रेल्वेस्थानकावरून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींना अटक केल्यानंतर कन्नेश्वर एकराम गुरनुले (२६) रा. महाजनवाडी, वानाडोंगरी ता. हिंगणा हे ठाण्यात पोहोचून त्यांनी आपला मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली. त्यांचा मोबाईलही आरोपींजवळ आढळला. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी इनामदार, निरीक्षक अभय पान्हेकर यांनी पार पाडली.(प्रतिनिधी)
मोबाईल चोरांची टोळी पकडली
By admin | Published: April 16, 2017 1:58 AM