लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात हैदोस घालत घरफोडी-चोऱ्या करून सामान्य नागरिकांसह पोलिसांचीही झोप उडविणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीन मधील पथकाने यश मिळवले. तीन जणांच्या या टोळीने १२ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने कपडे, मोबाईलसह घातक शस्त्रही जप्त केले.कपिल अशोकराव गवरे (वय २५, रा. गौतमनगर गिट्टीखदान), मोहम्मद शफीक मोहम्मद रफिक (वय २२, रा. मोमिनपुरा) आणि शेख सोहेल शेख सलीम (वय २२, रा. बोरगांव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींवर प्राणघातक हल्लयांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.गेल्या काही महिन्यात शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर पोलिसांचीही झोप उडाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीला अटक करून त्यांना बोलते केले असता त्यांनी १२ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात कळमना-२, मानकापुर ३, जरीपटका ३, गिट्टीखदान २, सक्करदरा १ आणि हुडकेश्वर १ अशा १२ घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणांहून उपरोक्त आरोपींनी रोख रक्कम, दागिने, चांदीची नाणी आणि टीव्ही चोरला होता. त्यापैकी पोलिसांनी आरोपींकडून २ लाख, ८३, ८०० रुपयांचे दागिने, मोबाईल, साड्या आणि टीव्ही जप्त केला.या टोळीचा म्होरक्या कपिल गवरे आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी धारदार सत्तूर, कोयता, मोठा चाकू जप्त केला. कपिल गवरेने गेल्या वर्षी एकावर प्राणघातक हल्ला चढवला होता. त्याला अटक करून पोलिसांनी कारागृहात डांबले होते. जानेवारी २०१८ मध्ये तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला आणि त्याने टोळी बनवून घरफोडीच्या गुन्ह्यांचा सपाटा लावला होता. ही कामगिरी गुन्हेशाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजपूत, एपीआय माधव शिंदे, योगेश चौधरी, हवलदार रफिक खान, शैलेंद्र पाटील, दयाशंकर बिसांद्रे, विठ्ठल नासरे, अरुण धर्मे, हरीश बावणे, राकेश यादव, विकास पाठक आदींनी बजावली.
नागपुरात कुख्यात गुन्हेगारांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:42 PM
शहरात हैदोस घालत घरफोडी-चोऱ्या करून सामान्य नागरिकांसह पोलिसांचीही झोप उडविणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीन मधील पथकाने यश मिळवले. तीन जणांच्या या टोळीने १२ गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने कपडे, मोबाईलसह घातक शस्त्रही जप्त केले.
ठळक मुद्दे१२ गुन्ह्यांची कबुली : दागिने, साड्या आणि मोबाईलही जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी