लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छडा लावला. या टोळीतील दोन महिलांसह चौघांना पोलिसांनी अटक केली. बिना यशवंत अडवाणी (वय ६०, रा.उत्कर्षनगर, वलय अपार्टमेंट, धरमपेठ), भीमाताई राजू वानखेडे (वय ५३, रा.भिलगाव), आशिष गुलाबराव शेंडे (वय २७, रा.सुभाषनगर, अंबाझरी) आणि हिमांशू धीरज सहारे (वय २०, रा.खलासी लाइन, सदर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही स्टॅम्प वेंडर त्यांच्या दलालाच्या माध्यमातून जुन्या तारखांचे स्टॅम्प पेपर विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. शहानिशा केल्यानंतर दलालाच्या माध्यमातून पोलिसांनी स्टॅम्प वेंडर बिना अडवाणी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून दोन महिन्यांपूर्वीचा तारखेचा स्टॅम्प पेपर सोमवारी विकत घेतला. १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर १,००० रुपये किमतीत अडवाणी यांनी पोलिसांच्या पंटरला दिला. त्याच वेळी त्यांना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या उपरोक्त तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, अडवाणी यांच्या धरमपेठमधील निवासस्थानी छापा घालण्यात आला. पोलिसांनी तेथे झडती घेतली असता, जुन्या तारखांचे ४७ कोरे स्टॅम पेपर त्यांच्याकडे आढळले. त्यांच्याकडे असलेल्या नोंदवहीत एकाच नावाने स्टॅम्प पेपर विक्री केल्याच्या खोट्या नोंदी पोलिसांना आढळून आल्या. त्यामुळे अडवाणी, वानखेडे, शेंडे आणि सहारे या चौघांना पोलिसांनी कलम १६७, ४६७, ४६८ अन्वये अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करून, त्यांचा २८ मेपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, उपनिरीक्षक लक्ष्मीछाया तांबूसकर, पी.एम. मोहेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
---
गुन्हेगार, भू माफियांकडून वापर जुन्या तारखांच्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर
ठिकठिकाणचे भूमाफिया, गुन्हेगार आणि अवैध सावकार मोठ्या प्रमाणात करतात. जमिनी, दुकान आणि अशीच मालमत्ता बळकावण्यासाठी, तसेच शासन, प्रशासनाची दिशाभूल करून सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी जुन्या तारखांच्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर केला जातो. त्यावर संबंधित मालमत्ता धारकांच्या सह्या घेऊन जुन्या तारखेमध्ये अभिलेख लिहून घेतला जातो. जुन्या स्टॅम्प पेपरची मागणी गुन्हेगारी षड्यंत्र रचणार्याकडून नियमित केली जाते. या प्रकरणाशी संबंधित कुणी गुन्हेगार आणि भूमाफिया आहेत काय, त्याचाही आता पोलीस तपास करीत आहेत.
---