नागपूर : गंगा-जमुना या वस्तीला ३०० ते ४०० वर्षांचा इतिहास आहे. तो माहीत नसणाऱ्यांनी एकदा अभ्यासावा. ही वस्ती काॅलगर्लची नसून देवदासींची आहे. या महिला बाहेर जात नसून माणसे येथे येतात. त्यामुळे ही वस्ती हटविण्याचा विचार करण्याऐवजी या महिलांना येथेच ठेवून त्यांचे सन्मानजक पुनर्वसन करा, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी पत्रकार परिषदेतून केले.
विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांच्या पुढाकारात झालेल्या पत्रकार परिषदेला साहित्यिक अरुणा सबाने, क्षत्रीय महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोरसिंग बैस, कवी तन्हा नागपुरी, आम्रपाली संघटनेचे अध्यक्ष सुनील चोखारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार सेल प्रदेशाध्यक्ष धनराज फुसे यांच्यासह गंगा-जमुना परिसरातील महिला उपस्थित होत्या.
राजे मुधोजी भोसले म्हणाले, एकेकाळी गावाबाहेर ही वस्ती होती. या वस्तीचा एवढा तिटकारा आहे, तर वस्तीजवळ नागरिकांनी घरे का घेतली? इ.स. १७०० पासून ही वस्ती येथे आहे. त्याचे इतिहासात पुरावे आहेत. या महिला येथेच राहतील. पटत नसेल त्यांनी या भागातून दुसरीकडे जावे. वस्तीवर आक्षेप घेणाऱ्यांनी त्यांच्या संकटकाळात कोणती मदत केली, असा प्रश्न विचारून ते म्हणाले, महिला संघटनाही त्यांच्या प्रश्नावर गप्प आहेत. मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असून त्यांच्या न्याय्य सन्मानासाठी सोबत राहू.
अरुणा सबाने म्हणाल्या, वस्तीत ५० ते ६० वर्षांपासून अनेक महिला येथे राहतात. त्यांच्याकडे सातबारा, ओळखपत्रे आहेत. या वस्तीत यापुढे अल्पवयीन मुले, मुली नकोत, या मताशी आम्ही सहमत आहोत. या महिलाही ते मान्य करतात. पोलिसांनी अलीकडे या परिसरात हॅन्डबिल वाटले. त्यात ‘कुंटणखाना’ अशा उल्लेखावर त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मुलांच्या भविष्याचा कळवळा दाखविणाऱ्यांनी आतापर्यंत काय मदत केली, असा प्रश्न त्यांनी विचारला.
ज्वाला धोटे म्हणाल्या, ही वस्ती हटविताना उपराजधानीत पोलिसांची हुकूमशाही दिसत आहे. येथील महिलांच्या पुनर्वसनासाठी आपण पालकमंत्र्यांना भेटून चर्चा केली. तोडग्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. महिलांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न न सुटल्यास या महिला पालकमंत्र्यांच्या दारात जाऊन जीव सोडतील, असा इशारा त्यांनी दिला.
...
महिलांनी मांडल्या व्यथा
पत्रकार परिषदेत वस्तीतील काही महिलांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आमचे पुनर्वसन नेमके काय व कसे करणार, या वयात आणि अशा परिस्थितीत आमच्याशी कुणी लग्न करणार आहेत का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पोलिसांचा वस्तीला पहारा असून बाहेर जाऊ देत नाहीत. आज सकाळी महिला पोलिसांनी दंड्याने मारहाण केली, असा आरोपही एका तरुणीने यावेळी केला.
...