नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला असला तरी गुरुवारी शेवटच्या क्षणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एबी फॉर्म देण्यात आला. मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळेच आपल्याला पक्षातर्फे एबी फॉर्म देण्यात आला असून आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहोत, असा दावा नाकाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेला जागा सोडलेली नाही, असे सांगत १५ जानेवारी रोजी मुंबईत पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल व तीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या संमतीनंतरच एबी फॉर्म जोडण्यात आल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. आता नाकाडे हे जर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील तर १५ जानेवारीची बैठक कुणाच्या समाधानासाठी घेतली जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक धंतोलीतील जिमखाना येथे पार पडली. बैठकीत उमेदवार नाकाडे यांच्यासह संपर्कप्रमुख आ. दुष्यंत चतुर्वेदी, सुरेश साखरे, सतीश हरडे, प्रमोद मानमोडे, दीपक कापसे, नितीन तिवारी, राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शिल्पा बोडखे, विशाल बरबटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त करीत कामाला लागण्याचे निर्देश देण्यात आले.
काही लोक संभ्रम निर्माण करीत आहेत : नाकाडे
- बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना गंगाधर नाकाडे म्हणाले, तीनही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत माझी उमेदवारी ठरली. काही लोक आता शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेश अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी आजही जयंत पाटील, नाना पटोले, बाळू धानोरकर यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व नेते आपल्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
बसपा व आम आदमी पक्षही मैदानात
- आम आदमी पक्षाकडून डॉ. देवेंद्र वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षक परिषदेचे उमेदवार गाणार यांनी जुनी पेन्शन बंद करणाऱ्या भाजपची आधी उमेदवारी नाकारावी मगच जुन्या पेन्शनची टोपी घालावी, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, संघटनमंत्री शंकर इंगोले, सचिव भूषण ढाकुलकर आदी उपस्थित होते. आम आदमी पार्टीचे दिल्लीतील शिक्षण मॉडेल संपूर्ण देशात आकर्षणाचे केंद्र बनले असून याच धर्तीवर महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याकरिता आपण काम करू, असे यावेळी देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले. बसपाकडून संजय निमा रंगारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेश महासचिव नागोराव जयकर, विजयकुमार डाहाट, जितेंद्र घोडेस्वार, सुरजभान चव्हाण आदी उपस्थित होते.