सुरक्षा ऐरणीवर : हजारो प्रवाशांच्या जीविताचा प्रश्ननागपूर : रेल्वे रुळाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी गँगमनला पार पाडावी लागते. एखाद्या ठिकाणी रेल्वे रुळ उखडला आणि गँगमनच्या लक्षात आले नाही तर रेल्वेगाडीच उलटण्याची शक्यता राहते. परंतु एवढे महत्त्वाचे काम सांभाळणाऱ्या शेकडो गँगमनला त्यांच्या कामाच्या ठिकाणावरून काढून अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सेवेसाठी जुंपले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दोन वर्षांपूर्वी नागपूर-वर्धा मार्गावरील सिंदी रेल्वे येथील रेल्वे पूल वाहून गेल्यामुळे रेल्वे रुळ हवेत लटकले होते. अर्ध्या तासाने या मार्गावरून रेल्वेगाडी जाणार होती. परंतु ड्युटीवर असलेल्या गँगमनच्या लक्षात ही बाब आल्यामुळे त्याने त्वरित या बाबीची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले होते. या प्रसंगावरून गँगमनच्या पदाचे महत्त्व सर्वांच्याच लक्षात येते. परंतु रेल्वेचे अधिकारी मात्र आपल्या फायद्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पद असलेल्या गँगमनला आपल्या सेवेसाठी बंगल्यावर ड्युटी लावून घेत आहेत. एका अधिकाऱ्याच्या बंगल्यावर ३ ते १० गँगमन तैनात राहतात. भाजी आणणे, गार्डनची सफाई करणे, गेट उघडणे अशी कामे त्यांना लावण्यात येतात. त्यामुळे उन्हातान्हात फिरून रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या गँगमनचे काम तर सोपे होते, परंतु सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊन प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होतो. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात जवळपास ३५०० हजार गँगमन आहेत. यातील ३०० ते ३५० गँगमन अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर आपली सेवा देत आहेत. यामुळे अधिकारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती गंभीर आहेत, याची प्रचिती येते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा गंभीर प्रकार त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)गँगमनच्या ड्युटीबाबत आंदोलन‘सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पद असलेल्या गँगमनला अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर तैनात करणे चुकीचे आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने यापूर्वी अनेकदा या बाबीचा विरोध केला आहे. परंतु तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे ‘एनआरएमयु’च्या वतीने लवकरच आंदोलन उभारण्यात येईल.’-हबीब खान, विभागीय सचिव, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन
गँगमन बंगल्यावर, रेल्वे ट्रॅक रामभरोसे!
By admin | Published: September 27, 2015 2:25 AM