चौघांनी केला अत्याचार : सात आरोपी गजाआड नागपूर : सुधार गृहातून पळून आलेल्या निराधार अल्पवयीन (वय १६) मुलीवर चार नराधमांनी रात्रभर बलात्कार केला. या घृणित कृत्यासाठी चौघांनी त्या चार नराधमांना मदत केली. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी सात आरोपींच्या मुसक्या बांधल्या तर एक आरोपी फरार आहे. आमदार निवासातील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली असताना पुन्हा एक सामूहिक बलात्काराचे प्रकरण घडल्याने उपराजधानीत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. तिच्या व्यसनाधीन वडिलांचे निधन झाल्यानंतर काही दिवसातच आईचाही मृत्यू झाला. ती ९ वर्षांची असताना तिच्या नातेवाईकांनी तिला श्रद्धानंद अनाथालयात आणून सोडले. गेल्या वर्षी तेथून ती काटोल मार्गावरील सुधार गृहात पोहचली. २० एप्रिलच्या सकाळी तिच्यासह ४ अल्पवयीन मुली तेथून पळून गेल्या. त्या रात्री सीताबर्डीतील एका दुकानाच्या आडोशाला थांबल्या आणि २१ एप्रिलला सकाळी तिघी निघून गेल्या. ही मुलगी याच भागात थांबली. रात्री १० वाजता ती सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मॉलनजिक फुटपाथवर बसून होती. भूकेने व्याकुळ झाल्यामुळे ती रडत होती. आरोपी फिरोज अहमद जमिल अहमद (वय ४०, रा. तहसील), त्याच्या दुकानातील नौकर मयूर रमेश बारसागडे (वय २३, रा. इंदोरा लघुवेतन कॉलनी) बाबा ऊर्फ अतुल ऊर्फ नरेश जनबंधू (वय २२, रा. कुशीनगर, जरीपटका) आणि चिंट्या ऊर्फ स्वप्नील देवानंद जवादे (वय २७, रा. राहूलनगर, सोमलवाडा) तिच्यावर नजर ठेवून होते. या चौघांनी तिला का रडते, अशी विचारणा केली. तिने खूप भूक लागल्याचे सांगताच आरोपींनी जेवणाचे आमिष दाखवून आरोपी चिंट्याच्याआॅटोत बसवले. त्यानंतर तिला सुगतनगर, जरीपटक्यातील एका निर्माणाधीन इमारतीच्या सदनिकेत नेले. तेथे तिच्यावर चौघांनी रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला. पहाटे ४ च्या सुमारास आरोपींनी तिला आॅटोत बसवून पुन्हा सीताबर्डीत आणून सोडले. शनिवारी सकाळी या भागात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक शाखेच्या पोलिसाला तिची अवस्था बघून संशय आला. त्याने तिला विचारपूस केली असता तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कैफियत सांगितली. ते ऐकून पोलिसाने तिला सीताबर्डी ठाण्यात आणले. अल्पवयीन निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे कळताच पोलीस यंत्रणा हादरली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीताबर्डीत धाव घेऊन मुलीची चौकशी केली. तिला जेवण दिल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिला आरोपींची नावे अन् पत्ताही माहीत नव्हता. पोलीस उपायुक्त राकेश कलासागर, सहायक आयुक्त किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या नेतृत्वात एपीआय चोपडे, महिला उपनिरीक्षक राऊत, पीसी प्रणिता, नायक प्रशांत, चंद्रशेखर, हवालदार अजय काळे, कमलेश गणेर यांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. आरोपींनी तिला जेथून आॅटोत बसवून नेले, त्या चप्पलच्या दुकानदाराला (फिरोज) ती ओळखत होती. त्यामुळे पोलिसांनी तिला मॉलजवळ नेताच चप्पलच्या दुकानात असलेल्या नराधम फिरोजकडे तिने बोट दाखवले. पोलिसांनी लगेच त्याच्या मुसक्या बांधल्या. त्यानंतर त्याच्या दुकानात काम करणाऱ्या मयूरला जेरबंद करण्यात आले. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून आरोपी स्वप्निल आणि त्यानंतर अतुलला पकडण्यात आले. शनिवारी रात्री आरोपींसोबत पोलिसांनी मुलीला घटनास्थळी नेले. तेथून आरोपींनी मुलीचे फेकलेले कपडे आणि गाद्या जप्त केल्या. त्यानंतर नराधमांना कुकर्मासाठी मदत करणाऱ्या सौमिल नरखेडकर आणि प्रलय मेश्राम या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आरोपी सुरेश भारसाकळे (६०) आणि साखरे बावाजी यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले. पोलिसांचे फेल्युअर?पीडित मुलीला आरोपींनी ज्या ठिकाणाहून उचलून नेले त्या ठिकाणी पहाटे ५ पासून तो मध्यरात्रीपर्यंत सारखी वर्दळ असते. या ठिकाणालगत वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या दोन चौक्या (बूथ) आहेत. बाजूलाच सीताबर्डी पोलीस स्टेशन आहे आणि आवाज पोहचेल एवढ्या अंतरावर परिमंडळ १ आणि २ च्या पोलीस उपायुक्तांची कार्यालये आहेत. असे सर्व असतानादेखील नराधमांनी तिला उचलून पाच-सात किलोमीटर दूर नेले. तिच्यावर रात्रभर अत्याचार केला अन् भल्या सकाळी तिला त्याच ठिकाणी आणूनही सोडले. तत्पूर्वी, सुधारगृहातून पळून गेल्याचा गुन्हा सदर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर ही मुलगी आणि तिच्यासोबतच्या तीन अन्य मुलींबाबतची माहिती शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये कळविण्यात आली होती.(प्रतिनिधी)पाप झाकण्यासाठी कपडे बदलविलेआरोपींनी पीडित मुलीला घटनास्थळी नेताना वाटेतून जेवण, पाण्याचे पाऊच आणि मेडिकल स्टोर्समधून आक्षेपार्ह साहित्य घेतले. त्यानंतर रस्त्यानेच सौमिल नरखेडकर आणि प्रलय मेश्राम या दोघांना फोन करून त्या सदनिकेत गाद्या पोहचवायला सांगितल्या. तेथे नेल्यानंतर आरोपींनी मुलीचे कपडे अक्षरश: फाडले. तिला परत आणून सोडताना हे फाटले कपडे आपले पाप चव्हाट्यावर आणू शकते, अशी कल्पना असल्यामुळे तिला जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून दिला. आॅटोचालकांचे दोन चेहरे या प्रकरणात आॅटोचालकाचे दोन वेगवेगळे चेहरे पीडित मुलीने बघितले. त्यात कृष्णा नामक आॅटोचालकाचा चेहरा दयाळू आहे. त्याने घटनेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता तिची अवस्था बघून तिला आपल्या आॅटोत बसवले. बाजूच्या समोसा विक्रेत्याकडे नेले. समोसा खाऊ घातला अन् परत आणून सोडले. आरोपी फिरोजच्या चपलाच्या दुकानापुढे दुसरा आॅटोचालक चिंट्या विकृतपणे तिच्याकडे बघत होता. ती निराधार, असहाय्य असल्याचे त्याने हेरले अन् आपल्या साथीदारांना गोळा करून एक वेळचे जेवण देण्याच्या बदल्यात तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
निराधार मुलीवर सामूहिक बलात्कार
By admin | Published: April 24, 2017 1:35 AM