नागपूर : बिहारमधील एका तरुणाला लुटणाऱ्या सराईत गुंडांना गणेशपेठ आणि तहसील पोलिसांनी अवघ्या अर्धा तासात अटक केली. ५ गुंडांच्या या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील महिला (बिंदूपूर) येथील सुबोधकुमार श्रीचंदेश्वरराय यादव (वय २६) हा गुरुवारी पहाटे ४ वाजता खंडव्यावरून नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला. त्याला मौदा येथे जायचे होते. त्यामुळे तो पायीच निघाला. रस्ता माहीत नसल्यामुळे त्याने रामझुल्यावर दिसलेल्या दोन मुलांना बसस्थानकाचा रस्ता विचारला. या मुलांनी त्याला रस्ता दाखवतो, असे म्हणत गार्ड लाईनकडे नेले. तेथे या मुलांचे तीन साथीदार आधीच बसून होते. त्यांनी चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून लाकडी दंड्याने सुबोधला मारहाण केली. त्याच्या खिशातील १०४० रुपये आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले. घाबरलेला सुबोध रस्त्याने पळत सुटला. त्याला गणेशपेठचे पीएसआय राठोड, नन्नावरे, तहसीलच्या महिला उपनिरीक्षक वडस्कर, उपनिरीक्षक ढाकुलवार, हवालदार प्रमोद मेश्राम, राजेंद्र यादव, सुनील चंदू, चंद्रकांत राठोड, रोशन, संजय बरेले हे रात्रीची गस्त करताना दिसले. सुबोधने त्यांना लुटमारीची घटना सांगितली. पोलिसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेऊन भिवसन कवडुजी बोकडे (वय १८, रा. टिमकी, चिमाबाई पेठ), मोहम्मद जावेद मोहम्मद समीम (वय १९, रा. भानखेडा, आंबेडकर पुतळ्याजवळ), मोहम्मद रिजवान मोहम्मद सलीम (वय १८, रा. मोमीनपूरा) योगेश शंकर मोबीया (वय १९) तसेच शुभंम राजू अंबादे (वय १८, दोघेही रा. भानखेडा, आंबेडकर पुतळ्याजवळ) यांच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी)
गुंडांची टोळी जेरबंद
By admin | Published: September 12, 2015 2:58 AM