नागपूर : पानझड आणि कडक उन्हाळ्यात जंगलात वणवा पेटण्याच्या घटना घडतात. त्यापासून बचावासाठी अनेक पातळीवर प्रयत्न करण्यात येतात. परंतु अलीकडच्या काळात सेमिनरी हिल्समध्ये प्रत्येक वळणावर युवकांचे टोळके धूम्रपान करताना दिसत आहे. बालोद्यानपासून बॉटनिकल गार्डनपर्यंत हीच स्थिती पहावयास मिळत असून, या परिसरात कधीही आगीची मोठी घटना घडण्याची शक्यता आहे.
खुलेआम धूम्रपान करणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. पानझडीमुळे चोहीकडे सुकलेली पाने पसरलेली आहेत. अशा स्थितीत येथे स्मोकिंग करणे म्हणजे मोठ्या घटनेस निमंत्रण देण्यासारखे आहे. सेमिनरी हिल्समधील गार्डनमध्ये सिगारेटसारखे ज्वलनशील पदार्थ विकण्यात येत आहेत. येथे नो स्मोकिंग झोन आहे. तरीसुद्धा जबाबदार अधिकाऱ्यांनी येथे स्मोकिंग करणाऱ्यांविरुद्ध आजपर्यंत काहीच कारवाई केलेली नाही. उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे आग रोखण्यासाठी सावधानी बाळगणे आवश्यक असते. शहराच्या मध्यभागी जंगल असल्यामुळे वनविभागाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. सेमिनरी हिल्समधील जंगलात चारही बाजूने वाळलेली झाडाची पाने पसरली आहेत. त्यामुळे तेथे कधीही मोठी आग लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
दुपारी असते सर्वाधिक गर्दी
सामान्यपणे गार्डनमध्ये सकाळी आणि सायंकाळी अधिक गर्दी असते. परंतु सेमिनरी हिल्समध्ये स्मोकिंग करणाऱ्या युवकांचे टोळके दुपारच्या वेळी अधिक जमते. अनेकदा युवकांना सिगारेट पिण्यास मनाई करण्यात येत असल्याचे एका स्थानिक दुकानदाराने सांगितले. परंतु हे युवक ऐकत नाहीत. काही युवक तर जळत असलेली सिगारेट फेकून देतात. अशा स्थितीत लक्ष न दिल्यास मोठी आगीची घटना घडू शकते.
तुटलेल्या भिंतीतून आत जातात नागरिक
सेमिनरी हिल्समध्ये चारही बाजूंनी सुरक्षा भिंत आहे. परंतु स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते मागील बाजूने एक स्थळ आहे. येथे युवकांचे टोळके स्मोकिंगसह नशापाणी करतात. त्यांची तक्रार कोणीच करत नाही. आत काम करणारे काही मजूर सिगारेट ओढतात. अशा स्थितीत संभाव्य आगीचा धोका पाहता यावर कारवाई करणे गरजेचे आहे. अशा मुद्यावर अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे या परिसरात पोलिसांची गस्त वाढविणे आवश्यक आहे.
..................