लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या समजला जाणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने आज गुरुवारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडाचा मास्टर मार्इंड म्हणून पोलिसांनी संतोषला आरोपी केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो फरार होता.मृत बाल्या गावंडे मध्य नागपुरातील अनेक भागात मटक्याचे अड्डे चालवित होता. तत्पूर्वी, २०१० मध्ये बाल्याने त्याचा प्रतिस्पर्धी भवानीसिंग सोनी याची हत्या केली होती. त्या प्रकरणात कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केल्यानंतर त्याने गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण केला होता. तो प्रॉपर्टी डीलिंगमध्ये सक्रिय होता. जमिनीच्या अनेक सौद्यात तो थेट हस्तक्षेप करीत होता. यातून तो कुख्यात संतोष आंबेकरच्या जवळ गेला. अनेक जमिनी, सदनिका, दुकानांवर कब्जा करून त्यांनी लाखो रुपये उकळले होते. २०१३ मध्ये महालमधील बडकस चौकाजवळ ११०० फुटाच्या एका वादग्रस्त जमिनीच्या सौद्यात संतोषच्या म्हणण्यावर प्रॉपर्टी डीलर काळे, ताजणेकर आणि महेश रसाळ या तिघांनी पैसे गुंतवले. ही जमीन नंतर एका कापड व्यावसायिकाला त्यांनी एक कोटी रुपयात विकली. या सौद्यात बाल्याचाही सहभाग होता. त्यामुळे त्याने कमिशन म्हणून तिघांना २० लाख रुपये मागितले. त्यांनी बाल्याला कमिशन म्हणून ६ लाख रुपये दिले होते. उर्वरित १४ लाख रुपये मिळावे म्हणून बाल्या या तिघांना धमकावत होता. त्यामुळे या प्रॉपर्टी डीलरने संतोषला सांगून बाल्याला आवरण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर संतोषने बाल्याला १४ लाख रुपये कशाचे मागतो, असा प्रश्न करून धमकावले होते. त्यावरून संतोष आणि बाल्याचा वाद झाला होता. त्यानंतर बाल्या गावंडे याने संतोष आंबेकरच्या नावाने काही ठिकाणी शिवीगाळ केली होती. बाल्याची खुनशी वृत्ती ध्यानात घेता तो धोकादायक ठरू शकतो, हे संतोषच्या ध्यानात आले. त्यामुळे त्याने बाल्याला संपवण्याचा कट रचला. बाल्याचा खास मित्र समजला जाणारा आणि बाल्याला जावई मानणारा कुख्यात गुंड योगेश कुंभारे ऊर्फ सावजी (वय ३०) याला काही दिवसांपूर्वी बाल्याने मारहाण केली होती. त्यामुळे संतोषने सावजीलाच फितवले. बाल्याचे अवैध धंदे तू सांभाळ, म्हणत बाल्याचा गेम करण्यासाठी त्याला तयार केले.ओल्या पार्टीनंतर घातठरल्याप्रमाणे २२ जानेवारी २०१७ ला रात्रीच्या वेळी सावजीने त्याच्या तुकारामनगर, कळमना येथील घरी ओल्या पार्टीचे आयोजन केले. बाल्याला घातपाताची शंका येऊ नये म्हणून सावजीने बाल्याची पत्नी जयश्री, त्याची मुलगी आणि प्रशांत पांडे नामक मित्राच्या कुटुंबीयांनाही पार्टीत बोलवून घेतले. सर्व महिलांना लवकर जेवण करायला सांगण्यात आले. छतावर बाल्या आणि सावजी त्याच्या साथीदारांसह दारू पीत बसले. रात्र झाल्याने बाल्याची पत्नी, मुलगी आणि अन्य काही जण आपापल्या घरी गेले. त्यानंतर दारूच्या नशेत टून्न झालेल्या बाल्यावर सावजी आणि त्याचे साथीदार तुटून पडले. तलवारीचे घाव बसल्यानंतर बाल्या जीवाच्या आकांताने पळू लागला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावरच त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.आरोपी सुटले, संतोष फरारचबाल्याच्या हत्याकांडाने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली. कळमना पोलिसांनी या प्रकरणात योगेश कुंभारे ऊर्फ सावजी, पिंकी ऊर्फ गंगाबाई कुंभारे, राजकुमार यादव, प्रशांत बोकडे, शुभम धनोरे, जयभारत काळे, महेश रसाळ आणि नवीन ताजनेकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशी आणि बयानानंतर संतोष आंबेकर आणि नितेश माने या दोघांना कट रचण्याच्या आरोपात आरोपी बनविले होते. आंबेकरने अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्याला यश न आल्याने तो फरार झाला. दरम्यान, या हत्याकांडात अनेक साक्षीदार बदलल्याने कोर्टाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. मात्र, आंबेकर फरार असल्याने त्याच्यावर या गुन्ह्याची सुनावणी वेगळी घेण्याचे ठरले होते.दरम्यान, वर्ष होऊनही संतोषला शोधण्यात यश न आल्यामुळे पोलिसांवर टीका होऊ लागली. त्यामुळे संतोषवर दडपण वाढवण्यासाठी पोलिसांनी संतोषची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. ते लक्षात घेत संतोष आज अचानक न्यायालयात पोहचला. संतोष आत्मसमर्पण करीत असल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. ही माहिती शहरात वायुवेगाने पसरली. त्यामुळे पोलीस, पत्रकार आणि गुन्हेगारी जगतातील अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार संतोषची कारागृहात रवानगी करण्यात आली. शुक्रवारी कळमना पोलीस त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेणार असल्याचे सांगितले जाते. या संबंधाने संतोषचे वकील अॅड. सौरभ सिंह यांनी फारसे बोलण्याचे टाळले.