लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा डॉन म्हणून कुख्यात असलेला संतोष आंबेकर याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी दुपारी मुसक्या बांधल्या. गुजरातमधील एका उद्योजकाला जमिनीच्या व्यवहारात फसवून त्यांच्याकडून ५ कोटी रुपये घेणा-या कुख्यात आंबेकरने त्यांना पुन्हा पिस्तुल दाखवून एक कोटी रुपये खंडणी मिळावी म्हणून धमकावले होते. त्याची तक्रार मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेकरच्या मुसक्या बांधल्या.जिगर पटेल यांची गुजरातमध्ये कॅस्ट्रॉल (ऑईल) रॉ मटेरियलची कंपनी आहे. दीड वर्षांपूर्वी एका दलालाच्या माध्यमातून मुंबईत पटेल यांची संतोष आंबेकरसोबत ओळख झाली. आंबेकरने यावेळी त्यांना मुंबईत आउटलेट सुरू करण्यासाठी एक जागा मिळवून देण्याची बतावणी केली. बनावट कागदपत्रे आणि जागा दाखविल्यानंतर सौदा पक्का करून टोकण म्हणून आंबेकरने पटेल यांच्याकडून ५ कोटी रुपये घेतले. जून २०१८ मध्ये हा व्यवहार झाला. तेव्हापासून जागा मिळावी म्हणून पटेल प्रयत्नशिल होते. लवकर विक्रीपत्र करावे, यासाठी ते आंबेकरसोबत संपर्क करायचे. अनेक महिने टाळल्यामुळे पटेल यांनी कागदपत्रांची शहानिशा केली असता ती जमिन आणि आंबेकरचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. नंतर आंबेकरने पटेल यांचा तगादा संपविण्यासाठी त्यांना नागपुरात बोलविले. सूत्रांच्या माहितीनुसार, सेंटर पाईंटमध्ये पटेल थांबले होते. येथे पटेल यांच्यासोबत आंबेकरने बैठक करताना ‘ मी नागपूरचा डॉन आहे. दिलेले पाच कोटी आणि ती जागा विसरून जा असे म्हणत पिस्तुलाच्या धाकावर धमकी दिल्याचे समजते. पाच कोटी परत करण्यास नकार देऊन आंबेकरने पुन्हा एक कोटींची खंडणी मागितल्याचाही आरोप आहे. पटेल घाबरतील, असा आंबेकरचा कयास होता. मात्र, त्यांनी ‘हॉटलाईन’चा वापर केल्यामुळे हे प्रकरण आंबेकरवर उलटले. आंबेकरने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईतील दुस-याची एक जागा दाखवून पाच कोटी हडपल्यानंतर पुन्हा एक कोटींची खंडणी मागितल्याची माहितीवजा तक्रार पटेल यांनी वरिष्ठ पोलिसांकडे सांगितली. थेट वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलल्यामुळे आंबेकरला शनिवारी दुपारी गुन्हे शाखेत बोलवून घेण्यात आले.त्याची तेथे चौकशी सुरू असतनााच सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फसवणूक करून आणि धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली आंबेकरला अटक करण्यात आली.साथीदारांचीही चौकशी !या प्रकरणात आंबेकर मुख्य आरोपी असला तरी त्याच्यासोबत आणखी पाच साथीदार आरोपी आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत असून रात्रभरात त्यांच्यापैकी काहींना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.हत्या, अपहरण, खंडणी वसूली असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात संतोष आंबेकर उपराजधानीतील गुन्हेगारी जगताचा भाई म्हणून ओळखला जातो. दोन वर्षांपूर्वी त्याने त्याच्या टोळीतील गुंड बाल्या गावंडे याची साथीदाराच्या माध्यमातून हत्या करवून घेतली होती. या प्रकरणात कटाचा सूत्रधार म्हणून गुन्हा दाखल होताच आंबेकर फरार झाला. या फरारीच्या काळातच त्याने पटेल यांना चूना लावला. नंतर एका माजी अधिका-याच्या सल्ल्यावरून तो पोलिसांना शरण आला. अटक करवून घेतल्यानंतर काही दिवस कारागृहात राहिला. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता.