लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांची हत्या करून, कित्येकांची मालमत्ता हडप करणारा आणि गुन्हेगारीच्या माध्यमातून कोट्यवधीची मालमत्ता जमविणारा कुख्यात गुंड रणजित सफेलकर याचा नागपूर-कामठी मार्गावरचा राजमहल नावाचा बंगला आज, बुधवारी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून भुईसपाट केला जाणार आहे. सफेलकर सध्या पोलीस कोठडीत आहे.
पाच कोटी रुपयांची सुपारी घेऊन त्याने आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या करवून घेतली होती. त्याचप्रमाणे सफेलकर आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी मनीष श्रीवास यांचीही हत्या केली होती. संपर्कातील विशाल पैसाडेली याला वाहनाने चिरडून त्याची हत्या केल्यानंतर तो अपघात असल्याचा बनाव केला होता. याशिवाय सफेलकरने कुणाचे दुकान, कुणाची जमीन, तर कुणाचा भूखंड हडपून कोट्यवधीची मालमत्ता जमविलेली आहे. त्याने अनेकांना जिवे मारण्याच्या धमक्या देऊन खंडणी वसुलीही केली आहे. त्याच्या पापाचा घडा फोडून गुन्हे शाखेने त्याला आणि त्याच्या साथीदारांना महिनाभरापूर्वी अटक केली. चौकशीत सफेलकर आणि त्याच्या टोळीने केलेल्या डझनावर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांनी त्याच्या अवैध संपत्तीची कागदपत्रे जप्त केली. त्याने कामठी नागपूर मार्गावर राजमहल नावाने बंगला बांधला. तो काळ्या पैशातून आणि पापाच्या कमाईतून बांधल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी तसा अहवाल प्रशासनाकडे सादर केला होता. हा बंगला भुईसपाट करण्याची परवानगी मागितली होती. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक महापालिका प्रशासनाच्या मदतीने सफेलकरचा राजमहल आज, बुधवारी सकाळी उद्ध्वस्त करणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे.
---
यापूर्वीही झाली कारवाई
गेल्या वर्षी गुन्हे शाखा पोलिसांनी गँगस्टर संतोष आंबेकर आणि खंडणीबाज साहिल सय्यद यांचेही बंगले अशाच प्रकारे जमीनदोस्त केले होते.
---