लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांच्या अनेक टोळ्यांना एकत्रित करून संघटित गुन्हेगारी करणारा खतरनाक गुंड, माया गँगचा म्होरक्या सुमित रमेश चिंतलवार (वय ३१) याच्या दोन साथीदारांसह गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून पोलिसांनी दोन विदेशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतूस, एक तलवार आणि दोन आलिशान कार जप्त केल्या. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना स्पॉट लावल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांच्या आधीच त्यांचा गेम करण्याच्या तयारीने सुुमित व त्याचे साथीदार आकाश किसन चव्हाण (वय २६) आणि स्वप्निल भाऊराव भोयर (वय २७) या दोघांसह नागपुरात आला आणि पोलिसांनी मंगळवारी त्याच्या मुसक्या बांधल्या.
अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत या संबंधाने माहिती दिली. यावेळी उपायुक्त (गुन्हे) गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने उपस्थित होते.कुख्यात सुमितवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, गोळीबार, अमली पदार्थांची तस्करी, शस्त्रांची तस्करी असे एकट्या नागपूर शहरात १० गुन्हे दाखल आहेत. पिंकू घोंगडे आणि बंटी समुद्रेच्या हत्याकांडानंतर सुमित गुन्हेगारी जगतात चर्चेला आला होता. अजनीत त्याची टोळी असून, माया गँग म्हणून ती कुख्यात आहे. या टोळीतील गुंडांनी अनेक गंभीर गुन्हे केले आहे. नागपुरातून तडीपार करण्यात आल्यानंतर सुमितने नागपूरसह वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपुरातील छोट्यामोठ्या गुन्हेगारांशी हातमिळवणी करून आपल्या टोळीला भक्कम बनविण्याचे प्रयत्न चालविले आहे. तो माया गँगसह अन्य टोळ्यांमधील गुन्हेगारांनाही प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांवर हल्ला करण्यासाठी वापरतो, हे ध्यानात आल्याने प्रतिस्पर्धी गुंडांच्या टोळ्यांतील गुंडांनीही सुमितचा स्पॉट लावण्याची तयारी चालवली होती. ते गेम करण्याआधी आपणच त्यांच्यातील एकाचा गेम करून त्यांना दहशतीत आणण्याची तयारी कुख्यात सुमितने केली होती. कुख्यात ताराचंद खिल्लारे, मिहीर मिश्रा, आशू अवस्थीपैकी तो एकाचा गेम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही टोळ्यांच्या गुंडांवर नजर रोखली होती.कुख्यात सुमित सोमवारी मध्यरात्री हिंगणा गुमगाव मार्गावरील एम्पेरियम सिटीतील १६ क्रमांकाच्या बंगल्यात साथीदारांसह दडून बसल्याची माहिती कळाल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक प्रमुख सत्यवान माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. मोठा ताफा घेऊन पोलीस सुमित दडून बसलेल्या बंगल्यात धडकले आणि तेथून त्यांनी सुमित, आकाश चव्हाण आणि स्वप्निल भोयर या तिघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्याकडून एक तलवार, जपानी बनावटीचे एक आणि दुसरे एक असे दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, एक स्कॉर्पिओ आणि दुसरी डस्टर कार जप्त केली. त्यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांचा २६ जुलैपर्यंत पीसीआर मिळविला.कुणाचा होता गेम?सुमितकडून पोलिसांनी दोन मोठ्या कार जप्त केल्या. त्यामुळे कारवाईच्या दरम्यान त्याचे आणखी काही साथीदार आजूबाजूच्याच परिसरात दडून असावेत आणि सुमितला अटक केल्याबरोबर ते पळून गेले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. सुमित एखादा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होता, हे अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी मान्य केले. मात्र, तो कोणता गुन्हा करणार होता, ते चौकशीत स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. तडीपार केल्यानंतरही सुमितने साथीदारांच्या मदतीने अर्जुन चट्टीयारचे १६ डिसेंबर २०१८ ला अपहरण केले होते. त्यानंतर आठ ते दहा गुन्हेगारांना घेऊन तो इमामवाड्यातील ताराचंद खिल्लारेचा गेम करण्यासाठी त्याच्या घराजवळ गेला होता. यावेळी ताराचंद आणि सुमितमध्ये ‘मोबाईल’वर कडाक्याचे भांडण झाले. एकमेकांवर ते हल्ला करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यातच पोलीस पोहचल्याने दोन्ही टोळ्यांमधील गुंड पळून गेले होते. तेव्हापासून सुमित ताराचंद, मिहिर किंवा आशूचा तर हे तिघे सुमितचा गेम करण्याची संधी शोधत असल्याची गुन्हेगारी वर्तुळात जोरदार चर्चा आहे.चंद्रपूर, वर्ध्यातही घट्ट पकडनागपुरातून तडीपार करण्यात आल्यानंतर सुमितने दारूबंदी असलेल्या चंद्रपूर तसेच वर्धा जिल्ह्यात पकड घट्ट केली. या दोन जिल्ह्यात रोज लाखोंची दारू तस्करी करून सुमित आणि साथीदार महिन्याला कोट्यवधींची उलाढाल करतात. कोळसा तस्करी आणि खंडणी वसुलीतही ते गुंतले आहेत. वर्धेतील टिनू गवळी नामक गुंडाच्या मदतीने त्याने नेटवर्क बनविले आहे. त्यात काही भ्रष्ट पोलिसांचाही समावेश आहे. युनिट चारमधील सहायक पोलीस निरीक्षक किरण चौगले, दिलीप चंदन, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, सुरेश हावरे, सहायक उपनिरीक्षक रमेश उमाठे, हवलदार बट्टूलाल पांडे, अजय रोडे, देवेंद्र चव्हाण, नृसिंह दमाहे, शिपायी रवींद्र राऊत, प्रशांत कोडापे, सतीश निमजे, बबन राऊत, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे, अविनाश ठाकूर, सूरज भोंगाडे, सुहास शिंगणे, आशिष पटेल, ज्ञानेश्वर तांदुळकर, दीपक झाडे आणि राजेंद्र तिवारी यांनी ही कामगिरी बजावली.