लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गँगस्टर सुमित ठाकूर याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. जामीन अटीचे उल्लंघन केल्यामुळे सोमवारी ही कारवाई करण्यात आली.फ्रेण्ड्स कॉलनी येथील एका शिक्षकावर हल्ला करून त्यांची कार जाळल्याप्रकरणी सुमितविरुद्ध गुन्हा दाखल होता. या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांचीही मोठी फजिती झाली होती. यानंतर सुमित, त्याचा भाऊ आणि साथीदाराविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर सुमितला न्यायालयातून सशर्त जामीन मिळाला होता. न्यायालयाने त्याला नागपुरात राहण्यास मनाई केली होती. त्याला वर्धेला राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानंतरही सुमित शहरात फिरत होता. पोलिसांनी न्यायालयाला सुमितने जामीन अटीचे उल्लंघन केल्याची सूचना दिली. न्यायालयाने आठवडाभरापूर्वी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान २४ मार्च रोजी गुन्हेगार नितेश चौधरी याने त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गोळीबार केल्याने खळबळ उडाली. त्याची सुमितसोबत मैत्री आहे. नितेश सापडल्याने आपल्याही अडचणी वाढतील, अशी सुमितला भीती होती. त्यामुळे त्याने न्यायालयासमोर समर्पण केले. न्यायालयाने त्याला गिट्टीखदान पोलिसांकडे सोपविले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून सुमितला तुरुंगात पाठवले.