राज आणि काजूचा वाद : अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागपूर : जुगारात ‘करू’चा वापर करून जुगार खेळणाऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या टोळीमध्ये थकीत वसुलीसाठी गँगवार सुरू झाला आहे. या टोळीने पूर्व नागपुरातील कुख्यात जुगारी बाबू ऊर्फ काजू याला दोन कोटी रुपयांनी बुडविले आहे. या रकमेच्या वसुलीसाठी काजूवर दबाव टाकला जात आहे. इतकी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने काजूसुद्धा गुन्हेगारांना शरण गेला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार कुख्यात राज आहे. राज एकेकाळी लॉटरीच्या दुकानात काम करायचा. लॉटरीच्या नावाखाली दुसरे धंदे कसे चालविले जातात, ते शिकून घेतले. यानंतर त्याने क्रिकेट सट्टेबाजी सुरू केली. या धंद्यात खूप कमाई झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व मिळविण्याची त्याची महत्त्वाकांक्षा वाढली. त्याने गुन्हेगाराच्या मदतीने एका युवकाचा खून केला तेव्हापासून राजचा उत्तर नागपुरात दबदबा वाढला. गुन्हेगारांमध्ये त्याची चलती असल्याने राज क्रिकेट सट्ट्यासोबतच जुगारचा अड्डाही चालवू लगला. त्याने जुगार अड्डा चालवण्यासाठी ‘करू’ ची मदत केली. जुगारच्या खेळात करूचे विशेष महत्त्व असते. जुगार खेळणाऱ्यांमध्ये तो पत्ते वाटण्याचे काम करतो. करू हातसफाईने जुगार खेळणाऱ्यांच्या डोळ्यात धूळ झोकून पत्त्यांची बाजी पलटवितो. या करूच्या मदतीनेच अनेक जुगार अड्डा चालवणारे मालामाल झाले आहेत. दुसरीकडे जुगार खेळणारे आपले सर्व काही विकून रस्त्यावर आले आहेत. यामुळे अनेकदा अशा ‘करू’चा खूनही झाला आहे. अशाच करूच्या माध्यमातून राज अनेक दिवसांपासून जुगार अड्डा चालवित आहे. शहरातील सीमेवर त्याचे फार्महाऊस आहे. तिथे तो जुगार आयोजित करीत असतो. फार्महाऊसवर मनोरंजनाची सर्वच साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरातील मोठमोठे जुगारी तिथे जुगार खेळायला जातात.राज अनेक दिवसांपासून करूच्या माध्यमातून जुगाऱ्यांना लुटत आहे. त्याने नुकतेच काजूसह सात ते आठ जुगाऱ्यांना कोट्यवधी रुपयांनी डुबविले आहे. काजू राजूच्या जुगार अड्ड्यावर दोन कोटी रुपये हारला आहे. सूत्रानुसार काजूला सोडून इतर जुगाऱ्यांकडून राजने दबाव टाकून पैसे वसूल केले आहेत. काजूने पैसे देण्यास नकार दिल्याने राजने गुन्हेगारांची मदत घेतली आहे. यामुळे काजूने एक कोटी रुपये परत केले. थकीत एक कोटी रुपयासाठी पुन्हा धमकावले जात असल्याने काजू सुद्धा गुन्हेगारांची मदत घेण्यासाठी पोहोचला. त्याने राजच्या प्रतिस्पर्धी गुन्हेगारांची मदत घेतली. तेव्हापासून दोन्ही टोळीतील गुन्हेगार आमोरासमोर आले आहेत. काजू एकेकाळी इतवारी येथे ड्रायफ्रूट आणि किराणा सामानाची दलाली करीत होता. या व्यवसायातून त्याला बाबू ऊर्फ काजू या नावाने ओळखले जाते. जुगार आणि क्रिकेट सट्टेबाजीत मालामाल झाल्याने त्याने दलाली सोडली. काही दिवसांपूर्वी लकडगंज येथे क्रिकेट सट्टेबाजीच्या वसुलीवरून एका तरुणाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाचे तारसुद्धा राजशी जुळले आहेत. राजच्या इशाऱ्यावरूनच त्यांनी अपहरण करून मारहाण केली होती.(प्रतिनिधी)
जुगाराच्या वसुलीवरून गँगवार
By admin | Published: October 06, 2016 2:42 AM