लोकमत न्यूज नेटवर्क
अभय लांजेवार/शरद मिरे/प्रदीप घुमडवार
उमरेड/भिवापूर/कुही : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचे बारा वाजले. दररोज पाच-पन्नास जणांना कोरोनाची लागण आणि त्यातच कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी धावाधाव. कुठे बेड नाही. ऑक्सिजन सिलिंडरचा वांदा तर कुठे उपचारासाठी डॉक्टर्स आणि परिचारिका उपलब्ध नाहीत. अशा बिकट परिस्थितीत कंत्राटी डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांसाठी जीव लावला. औषधोपचार केले. अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगाने अनेकजण हादरून गेलेत. शासनाला काम होते म्हणून या कंत्राटी डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेतले. कोरोना लाट ओसरली. त्यामुळे कंत्राटी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. ‘गरज सरो, वैद्य मरो’असाच प्रकार या कंत्राटी मनुष्यबळासोबत झाला. उमरेड विभागातील ४ डॉक्टर, १९ परिचारिका आणि अन्य ९ कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे.
उमरेड येथील कोविड सेंटरमध्ये एकूण २२ कंत्राटी मनुष्यबळ कर्तव्यावर होते. भिवापूर येथे एकूण ९ मनुष्यबळाच्या आधारावर संपूर्ण कोविड सेंटरचा कारभार यथोचित सांभाळला. कुही येथील कोविड सेंटरमधील मनुष्यबळ कर्तव्यावर आहे. उमरेड विभागात आतापर्यंत दोन हजारांवर कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये औषधोपचार करण्यात आले. कंत्राटी मनुष्यबळाच्या आधारावरच कोविड सेंटरचे कार्य यथोचित चालले. त्यांच्या या सेवाभावी प्रवृत्तीमुळेच ते ‘कोरोना योद्धा’ ठरले. दुसरीकडे शासनाने त्यांना कार्यमुक्त केल्याने जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना चटका सोसावा लागत आहे.
--
कुहीचे सेंटर सुरू
कुही सेंटरला दोन डॉक्टर, ६ परिचारिका आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांसह एकूण १० जणांचे मनुष्यबळ कर्तव्यावर आहे. विशेषत: कुहीच्या कोविड सेंटरला अद्याप कोणत्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत. तालुक्यात रुग्ण नाही. कुही कोरोनामुक्त आहे. सोबतच आजपावेतो या सेंटरमध्ये १९९ कोरोना रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. कुही तालुक्यात होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या अधिकांश होती, हे येथे विशेष.
-
कोरोना गेला, नोकरी गेली
ऐन धावपळीच्या क्षणात कंत्राटी मनुष्यबळाच्याच आधारावर संपूर्ण कोविड सेंटरच्या यंत्रणेने उत्तम कामगिरी पार पाडली. अशातच कोरोनाचा ग्राफ घसरला. अनेक तालुक्यांत मागील काही आठवड्यांपासून रुग्णांची संख्या शून्यावर आली. अशातच कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्यात आले. कार्यमुक्त केल्याने नोकरी गमवावी लागली. गावखेड्यातून अतिशय गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने अनेकांना आर्थिक आघात सोसावा लागला.
--
आता जगायचे कसे?
कोविड सेंटरमध्ये जे काम आम्हास दिले ते प्रामाणिकपणे केले. अचानकपणे असे काढायला नको होते. आरोग्य विभागात रिक्त जागा भरपूर आहेत. त्याठिकाणी आम्हास समाविष्ट करावयास हवे होते. मानधन कमी मिळाले असते तरी पोट भरता आले असते. आता नोकरीच गेल्याने जगायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोनाली गिरडे, चिचाळा, ता. भिवापूर
------
माझे वडिल शेतमजूर आहेत. अशा परिस्थितीत मी नागपूर येथून नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले. तीन महिने कोविड सेंटरमध्ये सेवाकार्यात गेले. अशातच कार्यमुक्त सुद्धा केल्या गेले. आता आर्थिक चणचण निर्माण झाली. जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणूनच आता जॉब शोधत आहे.
नम्रता कुबडे, हिवरा-हिवरी, ता. उमरेड
--
शासनाच्या दिशानिर्देशानुसार आम्ही कोविड केअर सेंटर मधून मनुष्यबळ कमी केले. कंत्राटी डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले असले तरी एखादा कोरोना रुग्ण आढळल्यास ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करू. भविष्यात शासनाचे पुन्हा कंत्राटी मनुष्यबळाच्या नियुक्तीचे आदेश आलेच तर पुन्हा भरती सुरू करू.
डॉ. प्रवीण राऊत, तालुका आरोग्य अधिकारी, भिवापूर
-------------------------------------------------------
कोविड सेंटरमध्ये सेवाभावी वृत्तीने आम्ही सेवाकार्य केले. कार्यमुक्तीनंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची भेट घेवून आमची समस्या आम्ही मांडली. निदान शासनाने आमच्या कामाचे, परिश्रमाचे कौतूक म्हणून आरोग्य विभागातील रिक्त जागा, लसीकरण आणि अन्य योजनेत आम्हाला प्राधान्य द्यावे अशी आशा-अपेक्षा ठेवून आहोत.
डॉ. निवेदिता निशाणे, उमरेड