लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात नवरात्रोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने घरगुती किंवा वैयक्तिक स्वरूपात साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा आहेत मार्गदर्शक सूचना सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.महानगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार मंडप उभारावे. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती मूर्तीसाठी २ फूट. पारंपारिक मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे.
नवरात्रोत्सवासाठी स्वच्छेने वर्गणीचा स्वीकार करावा. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी आदी जनजागृतीपर प्रदर्शनास प्राधान्य द्यावे. ध्वनिप्रदूषणासंदर्भात नियमांचे तंतोतंत पालन करावे.देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदीद्वारे व्यवस्था करावी. मंडपामध्ये एकाचवेळी पाचपेक्षा जास्त उपस्थिती नसावी. मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा जलपानाची व्यवस्था करण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडपाचे निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनिंग व्यवस्था करण्यात यावी. भाविकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात यावेत.