कर्मचारी अचानक संपावर : संपाच्या दिवसाची कपात केल्याचा वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने लकडगंज व गांधीबाग झोनमधील कचरा संकलन सायंकाळपर्यत ठप्प होते.
बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जून महिन्यात अचानक संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांनी काम न केल्याने या दिवसाचे वेतन कापले. यावरून कर्मचारी व व्यवस्थापनात वाद निर्माण झाला. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवरील चालकांनी सकाळी गाड्या उभ्या ठेवल्या. यामुळे गांधीबाग व लकडगंज झोन भागातील कचरा संकलन सायंकाळपर्यंत ठप्प होते.
.....
काम नाही तर वेतन कसे देणार?
जून महिन्यात वाहनांवरील कर्मचाऱ्यांनी नोटीस वा सूचना न देता अचानक काम बंद ठेवून संप पुकारला होता. कामावर नसल्याने एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. यामुळे बुधवारी कचरा संकलन करणाऱ्या वाहन चालकांनी अचानक काम बंद केले. यामुळे गांधीबाग व लकडगंज भागातील कचरा संकलन दुपारपर्यत ठप्प होते. मात्र दुपारनंतर कर्मचारी कामावर आले. काही नगरसेवकांचे लोक सफाई कर्मचाऱ्यांना भडकवतात. आरोग्य विभाग, अधिकाऱ्यांना कर्मचारी शिवीगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे.
रमाकांत भोम्बे, प्रकल्प अधिकारी ,बीव्हीजी