लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या झोन १ ते ५ मधील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एनव्हायरो कंपनीच्या ८०० सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी अचानक संप पुकारला. यामुळे दुपारी १ पर्यंत अर्ध्या शहरातील घरोघरून कचरा संकलनाचे काम ठप्प होते. व्यवस्थापन व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वाटाघाटी झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली.नागपूर शहरातील घरोघरून कचरा संकलनाची जबाबदारी महापालिकेने दोन खासगी कंपन्यांना सोपविलेली आहे. झोन क्रमांक १ ते ५ ची जबाबदारी एजी एनव्हायरो कंपनीकडे तर झोन क्रमांक ६ ते १० बीव्हीजी कंपनीकडे आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील बाजार बंद असल्याने कचरा संकलनाच्या दुसऱ्या शिफ्टमधील काम बंद आहे. शहरातील कचरा संकलन नाही, मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामुळे काही कर्मचाऱ्यांना काम नाही.सर्व कर्मचाऱ्यांना काम मिळावे यासाठी २६ दिवसाऐवजी २० दिवस काम देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला. मात्र सफाई कर्मचारी संघटनांनी याला विरोध दर्शविला. सर्व कर्मचाऱ्यांना महिन्यातील २६ दिवस काम मिळावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. यामुळे ५ झोनमधील कचरा संकलनाचे काम दुपारी १ वाजेपर्यंत ठप्प होते.
वाटाघाटीनंतर कामगार कामावर परतले
सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवल्याची माहिती मिळताच मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी एजी एनव्हायरो कंपनीचे अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर तात्काळ तोडगा काढण्यास सांगितले. त्यानुसार वाटाघाटीनंतर दुपारी १ वाजता कामगार कामावर आले.