बीव्हीजीची मनमानी सुरूच : वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्ध्या शहरातील कचरा संकलन व्यवस्था कोलमडली आहे. वेतन न मिळाल्याने बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी काम बंद केले. सोमवारी नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज या तीन झोनमधील कचरा संकलन पूर्णपणे ठप्प होते. तर मंगळवारी व आसीनगर झोनमधील कचरा संकलन काही प्रमाणात सुरू होते. याला मनपा प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत आहे. दोन दिवसात प्रशासनाने कंपनी व कर्मचाऱ्यांच्या वादावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढला नाही.
प्र्रशासनाने कर्मचारी काही तासानंतर कामावर पतल्याचा दावा केला. परंतु प्रत्यक्षात झोनस्तरावर सायंकाळपर्यत कचरा संकलन करणारी वाहने फिरताना दिसली नाही. काही भागात मागील तीन ते चार दिवसापासून वाहने न आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडून गांभीर्याने पार पाडली जात नाही. सत्तापक्षाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. दीड वर्षापूर्वी सत्तापक्षाच्या दबावामुळेच बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांची कचरा संकलनासाठी नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला प्रशासनाने कारवाई करताच ती दडपण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दोन दिवसापूर्वी घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त पदाची जबाबदारी राजेश भगत यांच्याकडे सोपविली. सोमवारी ते सुटीवर होते. तर आजवर या विभागाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. प्रदीप दासरवार जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे विभागाची जबाबदारी भगत यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. परंतु पावसाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत जबाबदारी बदलण्याची गरज नव्हती. तसेही आरोग्य अधिकारी (स्वच्छता) पद तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अपग्रेड करून उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) केले होते. याचा विचार करता या विभागासाठी पूर्णकालीन अधिकाऱ्यांची गरज आहे. प्रभार द्यावयाचाच असेल तर आरोग्य अधिकारी (स्वच्छता) हे पद कायम ठेवावे लागेल. त्याशिवाय दररोज नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींचा निपटारा होणार नाही. अन्यथा कचरा संकलन व स्वच्छतेबाबत समस्या सोडविताना प्रशासनाला घाम सुटल्याशिवाय राहणार नाही. भगत हे प्रतिनियुक्त अधिकारी आहेत.
...
अधिकारी सुटीवर
कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संपाबाबत विचारणा केली असता, राजेश भगत यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसून सुटीवर असल्याचे सांगितले. नोडल अधिकारी डॉ. दासरवार यांच्याशी संपर्क करा, असे ते म्हणाले. वास्तविक मनपात नोडल अधिकारी हे पद नाही. दासरवार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले. त्याच्याकडून पदभार काढला असतानाही आपली जबाबदारी ओळखून संपावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काही तासानंतर सर्व झोनमधील कर्मचारी कामावर परतल्याचे त्यांनी सांगितले.