सैयद मोबीन
नागपूर : शहरात ज्या प्रमाणात कचऱ्याचे संकलन होते, त्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात कचऱ्यावर प्रक्रिया होते. त्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये लाखो मेट्रिक टन कचरा संकलित होऊन कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसतात. आता या कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा निपटारा करण्यासाठी बायो मायनिंग तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी ठरत आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये वर्षभरापासून याचा उपयोग करण्यात येत आहे. येणाऱ्या दोन वर्षात भांडेवाडीच्या २५ एकर जमिनीवरील कचऱ्याचे ढिगारे साफ होणार आहेत.
शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा संकलित होतो. यातील केवळ २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्डात लाखो मेट्रिक टन कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. हे ढिगारे नष्ट करण्यासाठी आता बायो मायनिंग तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जात आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या या तंत्रज्ञानाच्या उपयोगातून सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. येणाऱ्या दोन वर्षांत भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील २५ एकर जमिनीवरील कचरा साफ होऊ शकतो.
- बायो मायनिंग कचरा नष्ट करण्यास यशस्वी
भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये जमा कचरा बायो मायनिंगद्वारे नष्ट करण्याचे काम सिग्मा एजन्सीला देण्यात आले आहे. वर्षभरापासून सुरू असलेले हे काम येणाऱ्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. याद्वारे २० ते २५ एकर जमिनीवरील कचऱ्याचे ढिगारे साफ होणार आहेत. याच पद्धतीने ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्यासाठी टेंडर काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २०० मेट्रिक टन कचऱ्याचे टेंडर काढण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टेंडर काढण्यात येईल.
- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा
भविष्यात दिसतील चांगले परिणाम
जमा कचऱ्याला ट्रीट करण्यासाठी बायो मायनिंग चांगले तंत्रज्ञान आहे. याला राष्ट्रीय हरित प्राधिकरण (एनजीटी) ने मान्यता दिली आहे. दिल्ली, केरळ, तामिळनाडू येथे याचा प्रयोग करण्यात येत आहे. कुंभकोणम येथे याचे यशस्वी परीक्षण झाले आहे. परंतु यात कचरा वेगवेगळा करावा लागतो. ‘विंड रोज’ बनविण्यात येतात. ज्यात मायक्रोबिएल प्रोसेसद्वारे मायक्रोब शिंपडल्या जाते. त्याद्वारे कचरा नष्ट होतो. सोबतच धातुसदृश वस्तूला वेगळे करून त्याचा पुन्हा उपयोग होऊ शकतो. नागपूरमध्ये आतापर्यंत याचा परिणाम चांगला दिसून येत आहे. याद्वारे डम्पिंग यार्डमध्ये जमा असलेला कचरा नष्ट करू शकणार आहे. त्याचबरोबर शहरातून दररोज निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात मनपाला लक्ष द्यावे लागेल. स्वच्छ सर्वेक्षणाच्या श्रेणीत येण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
- कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ