मंगेश व्यवहारे/मनोज झाडे
नागपूर : वानाडोंगरी ग्रामपंचायतीची नगरपरिषद झाल्यानंतर घराघरातून निघणाऱ्या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात नगरपरिषद प्रशासनाला यश आले. नगरपरिषदेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करीत आहेत; पण हा कचरा नगरपरिषदेच्या हद्दीतच साठविला जात असून, येथे मोठा डम्पिंग यार्ड तयार झाला आहे. या डम्पिंग यार्डच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
८० हजारांवर लोकसंख्या असलेल्या या नगरपरिषदेचे क्षेत्रफळ १२०७.५७ हेक्टर आहे. इलेक्ट्रिकल झोन ते रायपूर ग्रामपंचायतीपर्यंत वानाडोंगरी नगरपरिषदेचा परिसर विस्तारलेला आहे. सांडपाणी आणि गडर लाईनची मोठी समस्या आहे. ती कधी सुटेल सांगता येत नाही. घराघरातील सांडपाणी रिकाम्या प्लॉटमध्ये सोडल्याने वस्त्यावस्त्यांमध्ये घाण दूर्गंधी पसरली आहे. घराघरातून निघणारा कचरा देखील वानाडोंगरी वासियांच्या आरोग्यासाठी घातक ठरतोय.
नगरपरिषदेकडे कचरा उचलणाऱ्या १५ गाड्या आहेत. मात्र हा कचरा नगर परिषदेच्या क्षेत्रातच साठविला जात आहे. तिथे मोठे डम्पिंग यार्ड तयार झाले आहे. नगरपरिषदेच्या हद्दीतच साठविल्यामुळे मोकाट जनावरे व डुकरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे. कचऱ्याच्या डम्पिंगमुळे वानाडोंगरीमधील वस्त्यावस्त्यांमध्ये डुकरांचा उद्रेक आहे. डुकरांमुळे अस्वच्छता पसरली आहे. डम्पिंग यार्डमध्ये जाणारा कचरा हा सर्वच प्रकारचा आहे. डंम्पिंग परिसरातील कुत्रे आक्रमक झाले आहे.
- सेग्रिगेशन मशीन धुळखात
वानाडोंगरी नगरपरिषदमध्ये डम्पिंग यार्डमध्ये कचरा सेग्रिगेशनसाठी मशीन येऊन धूळ खात आहे आणि सर्व काम कामगारांकडून मास्क न वापरता करून घेत आहे. तिथे काम करणाऱ्या कामगाराच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे. खत बनवायचे नियोजन नसल्यामुळे तिथे कचऱ्याचे ढिगारे बनले आहे. डम्पिंग यार्डमध्ये नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी येऊन पाहत नाही, त्यामुळे डम्पिंग यार्ड पूर्ण ठेकेदाराच्या भरोशावर आहे.
कामगारांना कोणत्याही शासकीय सोयी सुविधा नाही. ठेकेदाराची मनमर्जी सुरू आहे. ठेकेदार आणि नगरसेवक यांच्या साटेलोट्यामुळे कामगारांचे शोषण होत आहे. तिथे सुरक्षा भिंत नसल्यामुळे गायी, डुक्कर, जनावरे सर्रास तिथे येतात. डम्पिंग यार्डला मागच्या दिवसात आग लागली होती; पण नगरपरिषदकडे अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे भविष्यात खूप मोठा धोका होऊ शकतो.
हा डम्पिंग यार्ड क्रीडा संकुलाच्या बाजूलाच आहे. शिवाय वस्तीमध्ये डम्पिंग यार्ड आहे. डम्पिंग यार्डातून सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे खेळाडू त्रस्त आहे. आजूबाजूला राहणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास होतो. तसेच उन्हाळ्यामध्ये येथील कचरा हवेने उडत येऊन घराच्या आजूबाजूला फेकला जातो. त्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो हा डंपिंग यार्ड दूर ठिकाणी घेऊन जाऊन सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जोपासण्याचे काम नगरपरिषदेने करावे.
- राजेश जोशी, रहिवासी, रचना अपार्टमेंट
वानाडोंगरी येथील डम्पिंग यार्ड उघड्यावर असल्यामुळे जेव्हा हवेची दिशा पलटते तेव्हा आम्हाला घाण व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नगरपरिषदने डम्पिंग गार्ड हे पूर्णपणे कव्हर करावे व वस्तीपासून दूर न्यावे, ज्यामुळे या उघड्या कचऱ्याचा नागरिकांना त्रास होणार नाही. नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.
- सूरज सांभारे, रहिवासी, साईराम चौक