लतिफ पठाण लल्लू पठाण (वय ४४) असे जखमीचे नाव आहे. तो बेस पॉवर हाऊसमागे झोपडपट्टीत राहतो. गांधीबागमध्ये कचरा वेचून तो उदरनिर्वाह करतो. त्याच परिसरात आरोपी राहुल सोनवणे (२५) हा सुद्धा कचरा वेचतो. नेहमीप्रमाणे लतिफ आणि राहुल हे दोघे शनिवारी रात्री अमरदीप बारच्या समोर कचरा वेचत होते. लतिफने राहुलला, तू समोर जाऊन कचरा गोळा कर, असे म्हटले. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. पाहता पाहता दोघे हातघाईवर आले आणि आरोपी राहुलने बाजूला पडलेले फावडे उचलून लतिफच्या डोक्यावर हाणले. त्यामुळे लतिफ गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूचे धावले आणि त्यांनी आरोपी राहुलला आवरले. जखमी लतिफवर उपचार करून घेतल्यानंतर तहसील पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली. त्याआधारे आरोपी राहुलविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----