लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस उपायुक्त (झोन-४) नीलेश भरणे यांनी गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवण्यासह विविध उद्देश डोळ्यापुढे ठेवून उद्यान रक्षक उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी सक्करदरा उद्यान येथे पहिली उद्यान रक्षक समिती स्थापन करण्यात आली.उद्यानांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण येतात. त्यांची विविध विषयांवर चर्चा होते. ते एकमेकांसोबत खेळतात. एकत्र फिरतात. व्यायाम करतात. त्यावरून भरणे यांना उद्यान रक्षक समितीची कल्पना सुचली. त्या कल्पनेला त्यांनी मूर्तरूप दिले आहे. उद्यान रक्षक समितीमध्ये ३० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच फेरीवाले, ज्येष्ठ नागरिक, महिला, स्वच्छता कर्मचारी आदींच्या सहा उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर परिसरातील गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवण्यासह उद्यानाचे रक्षण करणे, पर्यावरणाची सुरक्षा करणे, साफसफाईची काळजी घेणे, गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींची ओळख पटविणे इत्यादी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. उद्यान रक्षक समितीची दर शनिवारी बैठक होईल. उद्देश पूर्ण करण्यासाठी पोलीस या समितीला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. येणाऱ्या काळात हा उपक्रम अन्य उद्यानांमध्ये राबविला जाईल.भरणे यांच्या हस्ते पहिल्या समितीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक महाकाळकर, सहारे, रितू मोहाडीकर, वृशाली ठाकूर, आयएमए सचिव आशिष दिसावल, हायकोर्ट बार असोसिएशनचे कोषाध्यक्ष देवेंद्र पात्रीकर, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र कापगते, पोलीस निरीक्षक संदीपान पवार आदी उपस्थित होते. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
नागपुरात गुन्हेगारांवर लक्ष ठेवतील उद्यान रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:01 AM
पोलीस उपायुक्त (झोन-४) नीलेश भरणे यांनी गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवण्यासह विविध उद्देश डोळ्यापुढे ठेवून उद्यान रक्षक उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी सक्करदरा उद्यान येथे पहिली उद्यान रक्षक समिती स्थापन करण्यात आली.
ठळक मुद्देसमिती स्थापन : पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांचा उपक्रम