मनुस्मृती दहन : तात्काळ बंदी व बाजारातील प्रती जप्त करण्याची मागणीनागपूर : कालबाह्य झालेल्या अमानुष मनुस्मृतीचे मराठी भाषांतर करून त्याचा प्रचार प्रसार करण्यात येत असलेल्या कृतीचा बहुजन समाजासह सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. जागोजागी मनस्मृतीचे दहन केले जात आहे. मराठी भाषांतरित या मनुस्मृतीच्या विरोधात आता माळी समाजही रस्त्यावर उतरला आहे. अखिल भारतीय माळी महासंघ, महात्मा फुले शिक्षण संस्था, श्री संत सावता बहुउद्देशीय संस्था, उन्मन वंशीय विकास संस्था, क्षेत्रीय माळी विकास संस्था, विदर्भ माळी कल्याणकारी मंडळ, मौर्य काशी कुशवाहा संघटना अशा माळी समाजातील विविध संघटनांच्या माध्यमातून शुक्रवारी रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहासमोर मराठी भाषांतरित सार्थ श्री मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्याचे मराठी भाषांतर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या पुस्तकाच्या प्रकाशकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. या ग्रंथावर बंदी आणावी आणि बाजारात उपलब्ध असलेल्या प्रती जप्त कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने ही मागणी मान्य न केल्यास माळी समाज राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे यांनी यावेळी दिला. अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, गोविंदराव वैराळे, सुरेंद्र आर्य, रमेश गिरडकर, चंद्रभान भोयर, महादेवराव हरणे, रवींद्र अंबाडकर, रामराव चोपडे, ओंकारनाथ कुशवाह, नाना लोखंडे, प्रकाश बोबडे, डॉ. रामदास वाघे, राजेंद्र पाटील, गुलाबराव चिचाटे, शरदराव चांदोरे, मिलिंद पाचपोर, देवीदास लामखाडे, माधवराव घोळसे, अंजली अंबाडकर, वनिता हिवसे, दर्शना दवांडे, वर्षा बोळाखे, सिंधू पाटील, जयश्री कथलकर, सुलेखा पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माळी समाजही उतरला रस्त्यावर
By admin | Published: March 12, 2016 3:21 AM