लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा फटका दररोज सकाळ-संध्याकाळ उद्यानांमध्ये येऊन आरोग्यवर्धनासाठी व्यायाम करणाऱ्या नागरिकांना बसला आहे. टाळेबंदीच्या पहिल्याच दिवशी सोमवारी अनेक नागरिकांना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र होते.
नागपूर जिल्ह्यात १५ ते २१ मार्चदरम्यान टाळेबंदी आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, सार्वजनिक कार्यक्रमांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, उद्यानेही बंद ठेवल्याने अनेकांची नाराजी झाली आहे. शहरातील अनेक नागरिक आरोग्य संवर्धनाच्या हेतूने उद्यानातील हिरवळीवर योगसाधना, व्यायाम करत असतात, शिवाय मुलेही खेळण्यासाठी येत असतात. संध्याकाळच्या सुमारास उसंत म्हणून महिलाही उद्यानाची वाट धरत असतात. मात्र, टाळेबंदीमुळे आरोग्यवर्धनाच्या या क्रियांना लगाम लागला आहे. टाळेबंदीत उद्यानेही बंद राहतील, याची कल्पना नसल्याने सोमवारी अनेक जण उद्यानापर्यंत पोहोचले होते. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना येण्यास मज्जाव केला. त्यामुळे अनेकांनी मॉर्निंग वॉकचाच आनंद घेतला. उद्याने बंद असल्याने सकाळच्या सुमारास रस्त्यावरील गर्दीत प्रचंड वाढ झालेली दिसून आली. उद्यानातील सगळी गर्दी रस्त्यावर उतरल्याने ही स्थिती होती.
.................