लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील ४८ तासापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे गारवा वाढला आहे. नागपूरच्या अवकाशात दिवसभर ढग होते. दोन दिवसापासून सूर्यदर्शन नसल्याने या ढगाळी वातावरणात दिवसा थंडी तर रात्री काहीशी कमी असा अनुभव येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसापासून वातावरणात हा बदल घडला आहे. मात्र मंगळवारनंतर वातावरण स्वच्छ होत जाईल, असा अंदाज आहे. सोमवारी दिवसभर आकाशात ढग होते. सकाळी तर पावसाळ्यासारखे वातावरण होते. दिवसभरच हे वातावरण कायम होते. मात्र शहरात पावसाची नोंद नाही. असे असले तरी थंडी बऱ्यापैकी होती. नागपूरचे तापमान मागील २४ तासात सरासरी १.६ अंश सेल्सिअसने घसरले. शहरात दिवसभरात २६.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. बुलडाणा येथे सर्वात थंडीची नोंद झाली. तेथे ०.८ अंशाने पारा घसरल्याने तापमान २३ अंशावर होते. यातुलनेत वाशीममध्ये मात्र ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने नागपूर, चंद्रपूर, अकोला आदी जिल्ह्यात हलक्या पावसाचा इशारा दिला होता. मात्र दिवसभरात अकोला वगळता अन्य ठिकाणी पावसाची नोंद नाही. या वातावरणामुळे अकोलामध्ये ०.५ अंशाने पारा घसरला होता. तिथे २७.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील दिवसात वातावरण निवळत जाईल, असा अंदाज आहे. या आठवडाभरात वातावरण निवळले तरी वाऱ्याची दिशा बदलल्यावर थंडी वाढण्याची शक्यता आहे.