नागपूर: मुंबईत गेल्यावर्षी गोदामातच गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जीवित आणि वित्तहानी झाली होती. अशी दुर्देवी घटना शहरात होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागपूर जिल्ह्यात असलेली विविध कंपन्याच्या ११६ वितरकांची गॅस सिलिंडरची गोदामे शहराबाहेर तातडीने हलविण्याची मागणी अ.भा. ग्राहक पंचायतने सर्वच ऑइल कंपन्या आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गॅस एजन्सी कराहेत नियमांचे उल्लंघनआधी लोकसंख्येनुसार शहरांचे स्वरूप लहान होते. त्यानुसार सर्वच गॅस सिलिंडरची गोदामे शहराबाहेर आणि वस्त्यांपासून दूर होती. पण आता ही गोदामे दाट नागरी वस्त्यांमध्ये आली आहेत. काळानुसार गोदामांचे शहराबाहेर स्थलांतरण झालेच नाहीत. नियमाप्रमाणे गोदामे शहराबाहेर आणि एकांतस्थळी असणे आवश्यक आहे. शहरातील गॅस एजन्सीच्या कार्यालयांमध्ये सहापेक्षा जास्त सिलिंडर ठेवता येत नाहीत. या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याने एजन्सीच्या कार्यालयांना मिनी गोदामाचे स्वरूप आले आहे. दुर्देवाने या गोदामांमध्ये स्फोट झाल्यास जीवित आणि वित्तहानी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी गोदामे तातडीने शहराबाहेर हलविण्याचे आदेश काढावेत, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतचे (महाराष्ट्र व गोवा) पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी तेल कंपन्या आणि प्रशासनाकडे केली आहे.
मुंबईप्रमाणे विदर्भात मुख्यत्त्वे नागपूर जिल्ह्यात एखादी गंभीर दुर्घटना झाल्यानंतरच सरकारचे डोळे उघडतील काय, असा सवाल पांडे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर ग्राहक पंचायतच्या या मागणीकडे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करीत नाही ना, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहरातील गॅस एजन्सीच्या सिलिंडरच्या गोदामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी गजानन पांडे यांच्यासह अॅड. स्मिता देशपांडे, श्रीपाद भट्टलवार, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, अनिरूद्ध गुप्ते, प्रकाश भुजाडे, विलास ठोसर, अॅड. विलास भोसकर, तृप्ती आकांत, संध्या पुनियानी यांच्यासह ग्राहक पंचायतच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी केली.