लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने समलैंगिकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. या निर्णयाने समलैंगिकता आता गुन्हा ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय सुनावताच विदर्भातील समलैंगिक आणि ट्रान्सजेंटर तसेच या लोकांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. सीताबर्डी येथील लता मंगेशकर रुग्णालय परिसरात असलेल्या सारथी ट्रस्टच्या कार्यालयासमोर सायंकाळी सर्वांनी एकत्र येऊन जल्लोष केला. केक कापला तसेच ढोलताशांच्या गजरात आनंद साजरा केला. न्यायालयाच्या या निर्णयाने एकप्रकारचे स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर होता.सारथी ट्रस्ट ही एक कम्युनिटी बेस्ड आॅर्गनायझेशन असून, ती समलैंगिक आणि ट्रान्सजेंडरसाठी काम करते. ही संस्था अशा लोकांच्या एचआयव्ही आणि एड्स समस्यांसह त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरही काम करते.
न्यायलयाने दिलेला निर्णयामुळे आम्हाला गर्व वाटू लागला आहे. अनेक वर्षांची लढाई आम्ही जिंकलो आहोत. आज आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत आहे.- सीईओ, सारथी ट्रस्ट
न्यायालयाच्या निर्णयामुळे खूप आनंद झाला आहे. विदर्भात जवळपास दीड हजारावर असे लोक आहेत, परंतु ती आपली ओळख लपवून आहेत. सारथी अशा लोकांसाठी काम करते. समाज व कायदेशीर मान्यता नसल्याने असे लोक आपली ओळख लपवून राहत आहेत. परंतु न्यायालयाच्या या निर्णयानंतर लोक उघडपणे समोर येतील.- कुणाल मैंद, अॅडोकेसी आॅफिसर
आम्ही १९९७ पासून यासाठी लढा देत आहोत. आम्ही जो त्रास सहन केला तो येणाऱ्या पिढीला या निर्णयाने होणार नाही. परंतु अजून खूप काम करायचे आहे. आमच्या लोकांना येणाऱ्या समस्यांसाठी आम्ही लढत राहणार. न्यायालयाच्या या निर्णयाने खूप आनंद झाला असून, आज खऱ्या अर्थाने समलैंगिकांना न्याय मिळाला आहे.
- विद्या कांबळे