लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन नागपूर : सृष्टी मुळातच नृत्यमय आहे आणि मानव हा सौंदर्याचा उपासक आहे. याच सौंदर्य प्रेरणेतून आविष्कृत झालेल्या शास्त्रीय नृत्यातील एक सदाबहार प्रकार म्हणजे कथ्थक नृत्य. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कथ्थक नृत्याचे सर्वांसुंदर आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम व्हॉलिबॉल प्रांगण, लक्ष्मीनगर येथे दुर्गोत्सवात सादर करण्यात आला.कथ्थक या शब्दातूनच त्याच्या अर्थाचा सहज उलगडा होतो. कुठल्याही रोचक कथा-प्रसंगांना गायन व नृत्यासह अभिव्यक्त करणारे नाट्य-नृत्त-नृत्य यांच्या समतोल समन्वयाचे, कलात्मकता व रंजकतेच्या संमिश्रतेचे असे हे नृत्य आहे. हे नृत्य जेवढे सुंदर तितकेच वेधकही असते. त्यातही भाविकांच्या श्रद्धेचे व आवडीचे असे पौराणिक रामायणातील कथा, प्रसंगाचे सादरीकरण रसिकांना वेगळ्या अनुभवाची प्रचिती देणारे ठरते. मानवी स्वभावातील विविध पैलूंचा परिचय घडविणारे, बुद्धी व भावनेला स्तिमित करणारे हे नृत्यनाट्य गदिमा आणि संगीतकार सुधीर फडके या जोडगोळीने साकारलेल्या गीतरामायणावर आधारित होते. प्रतिभावंत नृत्यांगना सोनिया परचुरे आणि त्यांच्यासह ३७ नृत्य कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. पारंपरिक नृत्यभूषेतील युवा कलावंतांनी या नृत्याला आधुनिकतेची सुरेख किनार लावून हे मनोहारी सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका शांताक्का, विद्यमान संचालिका प्रमिलाताई मेढे व मानापुरे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले यांनी केले. नकुल घाणेकर, कुणाल, ऋग्वेद, अनुजा, अर्चना, गायत्री व क्षितिजा आदी कलावंतांनी यांनी यावेळी सादरीकरण केले. (प्रतिनिधी)
कथ्थकच्या नजाकतीने उलगडले गीतरामायण
By admin | Published: October 18, 2015 3:28 AM