नागपूर : महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने दणका दिला आहे. पाच वर्षांहून अधिक कालावधीपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत.
महापालिका मुख्यालयासह झोन कार्यालयात शेकडो कर्मचारी व अधिकारी मागील १० ते १५ वर्षांपासून ठाण मांडून आहेत. यातील अनेक जण तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने प्रशासनाने बदली केली तरी काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी बदलून येत होते. यामुळे मनमानी कारभार केला तरी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची धारणा त्यांच्यात निर्माण झाली होती. याचा कामकाजावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांना कामासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.
सर्वसामान्यांना दिलासा मिळणार
एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांचा मनपाच्या कर वसुलीवरही परिणाम झाला आहे. याचा विचार करता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने पाच वर्षांहून अधिक कालावधीपासून एकाच टेबलवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. मंगळवारी कर्मचाऱ्यांना ते प्राप्त झाले. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसान्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
बदली रद्द करण्यासाठी दबाव
झालेली बदली रद्द व्हावी, यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आमदार, मनपातील माजी पदाधिकारी यांच्याकडे धाव घेतली असून, बदली रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, बदली करण्यात आलेले कर्मचारी व अधिकारी पाच वर्षांपासून अधिक कालावधीपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने प्रशासन या दबावाला बळी पडणार नसल्याची मनपात चर्चा आहे.
सर्वच विभागांचा समावेश
महापालिकेच्या शिक्षण, सामान्य प्रशासन, कर आकारणी, बाजार, आरोग्य, समाजविकास, जलप्रदाय, स्थानिक स्वराज्य संस्था कर, उद्यान, आरोग्य(स्वच्छता), आरोग्य अभियांत्रिक, वित्त विभाग, जन्म-मृत्यू व नगररचना यासह अन्य विभागांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.